गुरूमाऊली अण्णासाहेब मोरेंची उपस्थिती : 25 हजार भाविकांची भोजनाची व्यवस्था
भुसावळ- दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे उद्या (ता.15) येथे राष्ट्रीय सत्संग सोहळा घेणार आहेत. त्यास जिल्ह्यातील सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक सेवेकरी बांधव उपस्थित राहतील. त्यादृष्टीने भुसावळला स्वामी समर्थ समर्थ सेवा केंद्रातर्फे तयारी आज पूर्ण झाली आहे. श्री.मोरेंच्या हितगुजानंतर महाप्रसाद होणार आहे. गेल्या 20 दिवसांपासून या राष्ट्रीय सोहळ्याची तयारी सेवेकरी करीत आहे. यानिमित्त ग्रामअभियान भुसावळसह रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर आदी परीसरात राबविले गेले. सेवेकरी नागरिकांनी घरोघरी जाऊन गुरूमाऊली मोरे यांचा सत्संग मेळावा घेण्याचा उद्देश सांगीतला. आजचा माणूस धकाधकीचे, ताणतणावाचे जीवन, आर्थिक समस्या, अशांती, कटकटी यासह विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. यातून आध्यात्मिक मार्गाद्वारे दुष्काळ, बेरोजगारी आदी समस्या दुर होण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी, भारतात धर्मनिरपेक्षता वाढीस लागावी, देशाचे संरक्षण व्हावे आदी हेतू घेऊन गुरूमाऊली हितगूज साधणार आहे. याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन भुसावळ श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेकर्यांनी केले आहे.
असे आहेत धार्मिक कार्यक्रम
भुसावळ येथील जळगावरोड वरील हुडको कॉलनीत भव्य असा मंडप उभारणीचे काम पुर्ण झाले आहे. उद्या दुपारी तीनला सत्संग सोहळा होईल. तत्पूर्वी दुपारी बारा ते तीन दरम्यान श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री. दुर्गा सप्तशती पाठ, श्री.स्वामी चरित्र सारामृत पाठाचे सामूहिक वाचन होईल. दुपारी तीन ते सहा दरम्यान गुरूमाऊलींचे अमृततुल्य हितगूज होईल. सायंकाळी सहाला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.