भुसावळ- घरातून निघाल्यानंतर शेजारीच असलेल्या विजेचा खांबाचा आधार घेणार्या अमृत बाबुलाल वर्मा या 65 वर्षीय वृध्दाला खांबात उतरलेल्या वीज पुरवठ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजेदरम्यान गंगाराम प्लॉट भागातील कोलते चेंबर परिसरात घडली. आधारासाठी पकडलेल्या वीजेचा खांबच वृध्दासाठी काळ ठरला. या घटनेनंतर महावितरण व पालिकेच्या अधिकार्यांनी पाहणी केली. दरम्यान दोन्ही विभागांनी हे प्रकरण टोलविण्याचा प्रयत्न केला. उर्जा व कामगार विभागाच्या जळगाव येथील विद्यूत निरीक्षकांच्या अहवालानंतर विजप्रवाह खांबात कसा उतरला? याचा उलगडा होणार आहे.
बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जामनेररोडवरील गंगाराम प्लॉट भागातील कोलते चेंबरच्या परिसरातील एका बोळात मुख्य रस्त्यावरुन कनेक्शन देवून महावितरणने विजखांब बसवला आहे. या खांबावरुन सर्व्हिस वायर टाकून घरांमध्ये वीजेचे कनेक्शन देखील देण्यात आले आहे. तर नगरपालिकेने याच खांबावर ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून एलईडी दिवा देखील बसविला आहे. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे अमृत बाबुलाल वर्मा हे घरातून बाहेर निघाले. त्यांनी चालताना आधार घेण्यासाठी जवळच असलेल्या वीजखांबाला स्पर्श केला. याच दरम्यान विजखांबात विजपुरवठा उतरला असल्याने त्यांना शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी कार्यकर्त्यांसह तत्काळ धाव घेतली. अमृत वर्मा यांना पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे विद्यूत अभियंता सुरज नारखेडे, कार्यालयीन अधिक्षक अख्तर खान, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी. आर. घोरुडे, शहर विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. दरम्यान महावितरणने जळगाव येथील उर्जा व कामगार विभागाचे विद्यूत निरीक्षक चेतन चौधरी यांना बोलवून पाहणी केली. दरम्यान चौधरी यांनी पाहणी पूर्ण अहवाल महावितरणकडे सादर केला जाणार आहे. या अहवालानंतर खांबात महावितरण किंवा पालिकेच्या केबलमधून विजपुरवठा उतरला हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान मृत अमृत बाबुलाल वर्मा यांचे पार्थिव जळगाव येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.