भुसावळवासीयांना दिलासा ; रॉ वॉटर यंत्रणा सुरू

0

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ- तापीच्या बंधार्‍यातील पाणी संपल्याने शनिवारपासून पालिकेची रॉ वॉटर यंत्रणा बंद करण्यात आली होती तर हतनूर धरणात सोडलेले पाणी मंगळवारी बंधार्‍यात पोहोचल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तीन दिवसांनी सुरू झालेल्या या यंत्रणेमुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होणार आहे. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिना सुरू असताना दुसरीकडे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने बांधवांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. शहराचा पाणीपुरवठा रविवारी सकाळपासून विस्कळीत झाल्याने नागरीकांना पुन्हा पाण्यासाठी भटकंती करावी लागली तर पालिका व नगरसेवकांच्या वैयक्तीक टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याची वेळ ओढळवली आहे. वारंवार पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. मंगळवारी दुपारी चार वाजेदरम्यान हतनूर धरणातून सोडलेले पाणी पालिका बंधार्‍यात पोहोचल्याने काही प्रमाणात जलसाठा वाढल्याने शनिवारी रात्री साडेनऊ वाजता बंद करण्यात आलेली रॉ वॉटर यंत्रणा मंगळवारी दुपारी कार्यान्वित झाली. शहरवासीयांना कमी दाबाने व तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार असून नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.