भुसावळसह चार स्थानकांवर ‘वायफाय’ सुविधेला प्रारंभ

0

भुसावळ:  भुसावळसह बडनेरा, अकोला व मनमाड रेल्वे स्थानकावर बुधवारपासून ‘मोफत वायफाय’ सेवेला प्रारंभ झाल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रेल्वे मंत्रालयाने भुसावळ विभागातील आठ ‘अ’ श्रेणी स्थानकावर मोफत वायफाय सुविधा पुरवण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुषंगाने रेलटेलला ही सुविधा पुरवण्याचा कंत्राट देण्यात आला होता. बुधवारी प्रत्यक्षात भुसावळ रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या गाडीच्या प्रतीक्षा जाणारा कंटाळवाणा कालावधी आता मनोरंजनाच्या माध्यमातून घालवता येणार असल्याने समाधान आहे.

जळगावसह नाशिककरांनाही लवकरच लाभ
भुसावळ विभागातील भुसावळसह जळगाव, नाशिक, बडनेरा, अकोला, मनमाड आदी आठ ‘अ’ श्रेणी रेल्वे स्थानकावर रेल्वे मंत्रालयाने मोफत वायफाय सुविधेची घोषणा केली होती तर प्रत्यक्षात बुधवारपासून भुसावळसह बडनेरा, अकोला व मनमाड रेल्वे स्थानकावर ही सुविधा कार्यरत झाली असून लवकरच नाशिक व जळगाव रेल्वे स्थानकांवर ही सुविधा कार्यरत होणार असल्याची माहिती रेल्वेचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली.

कसे वापराल ‘वायफाय’
अ‍ॅन्ड्राईड मोबाईल असलेल्या रेल्वे प्रवाशांनी वायफाय अ‍ॅक्टीवेट केल्यानंतर त्यांना रेल्वे वायफाय असा ऑप्शन उपलब्ध होईल. त्यावर क्लीक केल्यानंतर गुगलमध्ये गेल्यानंतर चार आकडी पासवर्ड उपलब्ध होईल. तो टाकताच या सुविधेला प्रारंभ होणार आहे.