भुसावळ । शहर व परिसरात शनिवार 1 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण झाले होते. तसेच रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र दुपारपासून पावसाचा वेग वाढल्याने पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक समजला जात आहे.
वातावरणात गारवा
गेल्या तीन दिवसांपूर्वी देखील पावसाने अल्प का होईना हजेरी लावल्यामुळे चिंतातुर झालेला शेतकरी सुखावला होता. यानंतर आज दुपारपासून पावसाचे शिडकाव सुरुच होते. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता. तसेच बसस्थानकावर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागला. मात्र पावसाचे आगमन झाल्याच्या आनंदामुळे हा त्रासही प्रवाशांनी दुर्लक्षित केला. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे जोरदार पर्जन्यवृष्टीची आवश्यकता होती. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळणार असून पिकांच्या वाढीस हातभार लागणार आहे.