भुसावळ । येथील दीपनगर केंद्रात विज निर्माण करण्यासाठी भुसावळ परिसराचे पाणी, जागा वापरली जाते. इंधन घेवुन येणारी रेल्वे व इतर साधन सामुग्री सोबत मनुष्यबळ हे याच परिसरातील आहे. अर्थात शासनाचेच आहेत. पण विज निर्मितीमध्ये स्थानिक योगदान जास्त आहे असे म्हटले तरी चालेल. त्यातच विज निर्मितीमूळे होणारे प्रदुषण व त्या प्रदुषणामूळे होणारे दुष्परिणाम येथील स्थानिक नागरिक व शेतकरी यांनाच सोचावे लागते. म्हनुनच स्थानिक परिसरातील नागरिकांना 24 तास विज पुरवठा करण्याची मागणी प्रा. धिरज पाटील यांनी केली आहे.
स्थानिक परिसरात भारनियमनमुक्तीची गरज
यासंदर्भात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठविले आहे. यात नमूद करण्यात आले की, भुसावळ परिसरामध्ये तयार होणारी विज इतर शहरांमध्ये व इतर राज्यांमध्ये जाणार तेथील शहरे 24 तास विज घेणार आणि भुसावळ परिसरात आपत्कालीन भारनियमन राहणार ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच वीज वितरण कंपनीच्या दीपनगर उपकेंद्रातून भारनियमनाव्यतिरिक्तही अनियमित वीजपुरवठा होत आहे. वेळी-अवेळी वीज गायब होण्याच्या प्रकारांत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वीज वितरण कंपनीचा एकप्रकारे मनमानीच सुरू असल्याचा संतप्त सूर नागरिकांतून उमटत आहे. वीज वितरण कंपनीच्या दीपनगर येथील उपकेंद्रातून साधारण 50 पेक्षा जास्त गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. या सर्व गावांतील लाखो ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून सेवा पुरविली जाते. काही दिवसांपासून सेवा अनियमित वीजपुरवठ्याच्या रुपाने ग्राहकांच्या माथी मारण्याचे काम वीज कंपनीकडून सुरू आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण शोधून काढावा, कालबाह्य यंत्रणा दुरुस्त करावी अशी मागणी आहे. दीपनगर केंद्राच्या 25 किलोमीटर पर्यंतच्या भागातील हे वाढते भारनियमन रद्द करावे, केंद्रीय कोट्याव्यतिरिक्त खासगी क्षेत्रातील स्त्रोतांमधून महावितरण सध्या वीज विकत घेत आहे व येथील संच बंद करीत आहेत या विषयाकडे लक्ष घालावे. तसेच परिसरातील शेतकर्यांची वीजबिले माफ करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.