भुसावळसह परीसरात दमदार पावसाची हजेरी

0

रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित ; सखल भागात साचले पाणी

भुसावळ- शहरासह परीसरात शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरीकांचे चांगलेच हाल झाले. दिवसभर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरीकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. शहरासह नजीकच्या कंडारी, अकलूद व यावल तालुक्यातील काही भागातही पावसाच्या सरी बरसल्या. विजांच्या गडगडाटासह रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी बरसतच होत्या. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित असल्याने नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. केरळात धडकलेला मान्सुन महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वीच दाखल झाला होता तर मृग नक्षत्राच्या आधीच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा व्यक्त होत असतानाच 2 जून रोजी दाखल झालेल्या मान्सुनमुळे समाधान व्यक्त होत आहे.

खंडित वीजपुरवठ्याने हाल
शनिवारी सायंकाळी पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. शहरातील जामनेर रोड परीसरात पाऊस थांबल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला असलातरी यावल रोडवरील वीजपुरवठा रात्री सुमारे पाऊण वाजेच्या सुमारास सुरळीत झाला. वारा-वादळामुळे वीज तारा तुटल्याने बिघाड शोधण्यात अधिक वेळ गेला मात्र बिघाड शोधल्यानंतर रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले.