जीएम दौर्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागात तयारीला वेग
भुसावळ: रेल्वेचे जीएम भुसावळ विभागाच्या दौर्यावर नवीन वर्षात 6 जानेवारी रोजी येत असल्याने तयारीला वेग आला त्यातच बर्हाणपूरसह भुसावळ रेल्वे स्थानकाला लूक बदलल्याने प्रवासीदेखील सुखावले आहे. भुसावळचे डीआरएम आर.के.यादव यांनी जातीने लक्ष घातल्याने भुसावळातील प्लॅटफार्म क्रमांक तीन राज्या-परराज्यासह परदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या प्लॅटफार्मवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत कोरलेली शिल्पचित्रे रेखाटण्यात आली असून ती लक्षवेधी ठरत आहेत त्या सोबतच नजीकच्या ऐतिहासीक म्हणून ओळख असलेल्या बर्हाणपूर शहरातील रेल्वे स्थानकाबाहेरील भिंतीवरही शहरातील गुरुद्वारासह आहुखाना, राजघाटाचे पेग्टिंग्ज बनवण्यात आल्याने शहरवासीयांसह पर्यटकांना ही बाब भावणारी ठरली आहे.
डीआरएम यांचा स्तुत्य उपक्रम
नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे डीआरएम आर.के.यादव भुसावळकरांना भावले आहेत शिवाय रेल्वे प्रवासी उत्पन्न वाढीसाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. भुसावळपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी देशभरातील पर्यटक भुसावळ जंक्शन स्थानकावर येतात त्यामुळे पर्यटकांना अधिक आकर्षित करण्यासाठी व पर्यटनाला चालण्या देण्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक तीनवर स्थापत्य वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूना ओळख असलेल्या अजिंठा लेणी बुद्ध कालीन मूर्तीचे पेग्टिंग्ज बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक मानल्या गेलेल्या व जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने जाहीर केलेल्या अजिंठा लेणीला जाण्यासाठी रेल्वे मार्गाने भुसावळ सोयीचे पडते. भुसावळात उतरलेल्या प्रवाशांना तसेच रेल्वेतून प्रवास करणार्या प्रवाशांना अजिंठा लेणीतील कलात्मकतेचे दर्शन सहज या चित्रांच्या माध्यमातून होणार असल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जीएम दौर्याची तयारी
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक एम.के.शर्मा हे 6 जानेवारी रोजी भुसावळ रेल्वे विभागाचा दौरा करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विभागात तयारीला वेग आला आहे तर रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेसह रंगरंगोटी केली जात आहे. डीआरएम यादव स्वतः दररोज रेल्वे स्थानकाला भेट देऊन आढावादेखील घेत आहेत.