भुसावळात मराठा एकतेची वज्रमुठ : मोर्चाने वेधले लक्ष

0

आमदार सावकारेंचा आरक्षणाला पाठिंबा : व्यापार्‍यांनी पाळला उत्स्फूर्त बंद

भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी क्रांतीदिनी गुरुवार, 9 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला भुसावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भुसावळसह बोदवड, रावेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर यावल शहरात दुपारी दोन वाजेनंतर कडकडीत बंद पाळण्यात आला. मुक्ताईनगरासह पूरनाड फाट्यावर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झोली हाती. दरम्यान, बंदमुळे ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.च्या फेर्‍या जवळपास सर्वच ठिकाणी रद्द झाल्याने आगारांना लाखो रुपयांचा फटका बसला तर दुसरीकडे शासकीय कर्मचार्‍यांच्या संपामुळे शाळा-महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाटही कायम होता.

भुसावळ शहर कडकडीत बंद : मोर्चाने वेधले लक्ष
भुसावळ- शहरात व्यापार्‍यांनी गुरुवारी सकाळपासून उत्स्फूर्तपणे बंद पाळला असून शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी घरीच राहणे पसंत केले. सकाळी 11 वाजेपासून सकल मराठा समाजातर्फे नाहाटा महाविद्यालयापासून मोर्चाला प्रारंभ झाला. जामनेर रोड, अष्टभूजा देवी चौक, अप्सरा चौक, भारत मेडिकल, मरीमाता मंदिर, मोठी मशीद, रेल्वे लोखंडी पूल, वसंत टॉकीज, तहसील कार्यालय व नंतर प्रांताधिकारी कार्यालयाजवळ रॅलीचा दुपारी 12.30 वाजता समारोप झाला. प्रसंगी सकल मराठा समाजाचे भुसावळ शहराध्यक्ष प्रा.रवींद्र लेकुरवाळे यांनी मार्गदर्शन केले. भाजपा शासनाने आरक्षणासंदर्भात आमची फसवणूक केली असल्याचे आता न्यायदेवतेवर आमचा विश्‍वास असल्याचे ते म्हणाले. आमच्या हक्काचे आरक्षण न मिळाल्यास या सरकारची आम्ही वाटू लावू, असा स्पष्ट ईशारा त्यांनी दिला. प्रसंगी प्रांताधिकारी प्रशासनाला समाजातील पाच महिलांनी प्रातिनिधीक स्वरूपात निवेदन दिले. सरकारचा निषेध म्हणून सर्व आंदोलकांनी शर्टच्या दर्शनी भागात काळी रीबीन लावली होती. महिलांचादेखील लक्षणीय सहभाग होता.

अशा आहेत आंदोलकांच्या मागण्या
भुसावळातील सकल मराठा समाजाने प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे, मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी जिल्हा स्तरावर हॉस्टेलची सुविधा करावी, अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत बेरोजगारांसाठी घोषीत कर्ज प्रकरणांची अंमलबजावणी करावी, कोपर्डीतील आरोपींना फाशी द्यावी, आरक्षण आंदोलनात आत्मबलिदान केेलेल्यांचा कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत व एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, आंदोलन काळातील गुन्हे सरसकट मागे घ्यावे यासह अन्य 11 मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मनीष देशमुख, अश्‍विनी पाटील, स्वरदा ओगवे, प्रतीक्षा पवार, मनोरमा ओगरेचा, अलका भगत, सायली पवार, मनीषा पवार, डिंपल पवार आदींच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

भुसावळातील सारंग पाटलांचे दातृत्व : 1400 आंदोलकांना जेवण
भुसावळ- सकल मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी तब्बल एक हजार 400 आंदोलकांना भुसावळातील समाजसेवक तथा हॉटेल खालसा पंजाबचे संचालक सारंगधर (छोटू) पाटील यांच्यातर्फे जेवण देण्यात आले. पुरी, भाजीसह पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिल्याने समाजबांधवांनी त्यांना धन्यवाद दिले. मोर्चामागे कचरा संकलनासाठी रीक्षाचीदेखील व्यवस्था पाटील यांनी करून दिली. शंभूराजे ग्रुपतर्फे एक हजार पाणी बॉटलची व्यवस्था करण्यात आली.

आमदार संजय सावकारेंनी दिला आंदोलनाला पाठिंबा
सकल मराठा समाजाला आंदोलन मिळण्याच्या मागणीला भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे समाजाच्या मोर्चात त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून व्यावसायीकांनी दुकाने बंद ठेवली. सायंकाळी पाच वाजेनंतर तुरळक स्वरूपात दुकाने उघडण्यात आली. बंदमध्ये शहरातील व्यावसायीकांसह पेट्रोल पंप चालक तसेच किरकोळ विक्रेते तसेच विविध व्यवसाय करणार्‍या विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला. अत्यावश्यक सेवा असलेली केवळ मेडिकल दुकाने सुरू होती. बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. भुसावळ विभागाचे उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्‍यांनी कडेकोट बंदोबस्त राखला.

दिवसभर आगारातून फेर्‍या ठप्प
बंदच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र बसफेर्‍या बंद ठेवण्यात आल्या होत्या तर भुसावळ आगारातून सायंकाळी उशिरापर्यंत एकही बस फेरी सोडण्यात आली नाही त्यामुळे आगाराला सुमारे तीन लाखांचा आर्थिक फटका बसला. भुसावळ आगारातून दररोज किमान 188 फेर्‍या लांब पल्ल्यासह ग्रामीण भागात धावतात मात्र बंदमुळे एकही बस धावू शकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.