भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यात दिड लाख पुस्तके प्राप्त

0

मुक्ताईनगर तालुक्यासाठी पहिली ते आठवीपर्यंत मराठी माध्यमाची 42 हजार 395 पुस्तके प्राप्त

भुसावळ- उन्हाळी सुटीनंतर 17 जून रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार असून पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पासह पुस्तकांनी स्वागत केले जाणार असून या निमित्त शाळेचा परीसरही सजवण्यात येणार असून ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. भुसावळसह मुक्ताईनगर तालुक्यात पहिल्या टप्प्यात सुमारे एक लाख 42 हजार पुस्तके प्राप्त झाली आहेत. लवकरच पुस्तकांचा दुसरा टप्पाही येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील पुस्तके प्राप्त
जिल्हा परीषदेसह खासगी माध्यमांच्या अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास अडीच लाख पुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी रविवारी पहिल्या टप्प्यात सातवीपर्यंतची एक लाख एक हजार 682 पुस्तके पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहेत. रविवारी मोफत पुस्तकांचे पहिले वाहन भुसावळ म्युनिसीपल हायस्कूलमध्ये उतरवण्यात आले. भुसावळ शिक्षण विभागासाठी यंदा दोन लाख 55 हजार 782 पुस्तकांची आवश्यकता आहे. मे महिनाअखेर सर्व पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त होतील. भुसावळ तालुक्यात पहिली ते आठवीपर्यंत प्राथमिक व खासगी माध्यमांच्या 157, जिल्हा परीषद 66, पालिकेच्या 18 तर उर्वरित खासगी माध्यमांच्या शाळा आहेत.

अचूक नियोजनावर भर
मोफत पाठ्यपुस्तकांचा भुसावळ तालुक्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या 33 हजार 838 विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन प्रत्येक शाळांनी केले आहे. मे अखेर सर्व पुस्तके पंचायत समितीस्तरावर प्राप्त होतील. त्यानंतर केंद्र शाळांवर गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके पोहोच केले जातील, अशी माहिती गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ संजय गायकवाड व नावीद खाटीक यांनी दिली.

मुक्ताईनगर तालुक्यात उर्दूसह सेमीच्या पुस्तकांची प्रतीक्षा
मुक्ताईनगर-
पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मराठी माध्यमाची एकूण 42 हजार 395 पुस्तके येथील शिक्षण विभागाला रविवारी प्राप्त झाली. उर्दू व सेमी माध्यमाच्या पुस्तकांची मात्र अद्याप प्रतीक्षा आहे. मुक्ताईनगर येथील गटसाधन केंद्रात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळातर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची उर्दू व सेमी माध्यमाची पुस्तके वगळून मराठी माध्यमाची पुस्तके प्राप्त झाली. तालुक्यातील शाळांमधून विद्यार्थी संख्येनुसार पाठ्यपुस्तके मागवण्यात आली आहेत. ही पाठ्यपुस्तके 30 मेपर्यंत तीन टप्प्यांमध्ये प्राप्त होणार आहेत. यातील पहिला टप्पा 19 रोजी प्राप्त झाला आहे. यात पहिलीचे दोन हजार 355 संचांमध्ये इंग्रजी, गणित, बालभारती, इयत्ता दुसरीत एक हजार 890 संचांमध्ये गणित, बालभारती, इंग्रजी, इयत्ता तिसरीमधील दोन हजार 140 संचांमध्ये बालभारती, परिसर अभ्यास, इंग्रजी, गणित, इयत्ता चौथी मध्ये दोन हजार 340 संचांमध्ये इंग्रजी, गणित, बालभारती परिसर अभ्यास, इयत्ता पाचवीमध्ये दोन हजार 419 संचांमध्ये बालभारती, गणित, इंग्रजी, परीसर अभ्यास, हिंदी, इयत्ता सहावीत दोन हजार 419 संचांमध्ये बालभारती, इतिहास, गणित, भूगोल, सामान्य विज्ञान, हिंदी, इंग्रजी, इयत्ता सातवीत 2426 संचांमध्ये बालभारती, इतिहास, गणित, इंग्रजी, हिंदी, सामान्य विज्ञान, भूगोल, इयत्ता आठवी दोन हजार 551 संचांमध्ये सुलभ भारती, विज्ञान, गणित, इतिहास-नागरिक शास्त्र, इंग्रजी अशी एकूण 42 हजार 395 पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. जिल्हा स्तरावरून प्राप्त आदेशान्वये एम.एस.मालवेकर, वाय.बी. भोसले, मधुकर सैतवाल हे कर्मचारी पुस्तके उतरवताना उपस्थित होते.