जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम : मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सोलर पॅनलद्वारे उर्जा निर्मिती -माजी मंत्री एकनाथराव खडसे
भुसावळ- ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनांसह पथदिव्यांचा वीजपुरवठा थकबाकीअभावी नेहमीच खंडित करण्याचे प्रकार होत असल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये यापुढे सोलर पॅनलद्वारे उर्जा निर्मिती केली जाईल व त्यामुळे शेतकर्यांना 50 टक्के वीज बिलात सुट मिळणार असून जिल्ह्यातील हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट राहणार असून त्यानंतर जिल्हाभरात त्या पद्धत्तीने कामाला सुरुवात होईल, अशी माहिती माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली. शहरातील आयएमए सभागृहात भुसावळ विभागातील भुसावळसह मुक्ताईनगर, बोदवड व सावदा नगरपंचायत व एसएलएनपी या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ईईएसएल या कंपनीत उर्जा बचतीचा करार शनिवार, 4 ऑगस्ट रोजी करण्यात आला. खडसे यांच्या पुढाकाराने झालेल्या करारप्रसंगी ते बोलत होते. या करारानंतर भुसावळ पालिकेसह तीन नगरपंचायतीच्या वीज बिलात 50 टक्के बचत होणार असून त्या माध्यमातून विकासकामे करता येणार आहे तर सात वर्षांच्या या करारात संबंधित कंपनी सर्वत्र एलईडी दिवे लावून त्याचा मेन्टेनन्सही राखणार असल्याचे खडसे म्हणाले.
उर्जा बचतीचा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम -खडसे
माजी मंत्री खडसे म्हणाले की, उर्जा बचत काळाची गरज आहे. उर्जा बचतीच्या या करारानंतर सात वर्षांपर्यंत संबंधित कंपनी मेन्टनन्ससह एलईडी बदलण्याचे काम करणार आहे शिवाय जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. पालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून त्या माध्यमातून कंपनीचा खर्च वजा जाता उर्वरीत शिल्लक निधी पालिकेला मिळाल्यानंतर तो विकासकामांसाठी खर्च करता येणार आहे. 24 तासात एलईडी बल्ब बदलून मिळणार असून या कंपनीत स्थानिक बेरोजगारांना व आयटीआय झालेल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती संबंधित कंपनीला आपण केली आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट महिन्यात सौर पॅनल बसवण्याच्या कामास प्रारंभ होणार आहे. गावठाण व गायरान जमिनी त्यासाठी घेतली जाणार असून त्या माध्यमातून शेतकर्यांना किमान दिवसा दहा तास वीज मिळेल व त्यांच्या वीज बिलात 50 टक्के बचत होवून भारनियमनातून त्यांची सुटका होणार आहे.
साहित्य खरेदी आपला छंद : खडसेंचा मार्मिक टोला
भुसावळ विभागातील अन्य पालिकांनाही आपण उर्जा बचतीच्या उपक्रमात आपण सहभागाचे आवाहन केले. त्यांनी सुरुवातीला होणार वीज व पैशांची बचत हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात त्यात सहभाग नोंदवला नाही अर्थात त्याचे कारण साहित्य खरेदी आपला आवडता छंद असल्याचा मार्मिक टोला खडसे यांनी लावला. अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीच्या माध्यमातून होणार्या भ्रष्टाचारावरच त्यांनी बोट ठेवल्याने सभागृहात खसखसही पिकली.
मुख्यमंत्र्यांनी दिला निधी -विकास निश्चित होणार
खडसे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी भुसावळ पालिकेला 15 कोटींचा निधी रस्त्यांसाठी दिला आहे तर शहर सुशोभीकरणासाठी दहा मिळणार लवकरच मिळणार आहेत. भुसावळ न्यायालयाजवळ पालिकेची प्रशासकीय सुसज्ज ईमारत बांधली जाणार आहे. नियमानुसार त्याबाबत काम सुरू असून जिल्हाधकिार्यांचेदेखील त्यासाठी सहकार्य लाभत आहे. तापी प्रदूषणमुक्त योजनेंतर्गत भुसावळातील गटारीतून वाहणारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करून हे पाणी दीपनगर प्रकल्पाला विकत दिले जाणार असून त्या माध्यमातून पालिकेला निधी मिळणार आहे व हा किमान 150 कोटींचा प्रोजेक्ट आहे. रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कामाच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत मात्र या प्रोजेक्ट बनवण्यासाठी आताच तीन कोटींची आवश्यकता आहे व पालिकेची परीस्थित्ी पाहता पुढे काय-काय मिळते हे देखील पहावे लागेल, असे खडसे म्हणाले.
चार पालिकांची लवकरच हद्दवाढ होणार
भुसावळसह सावदा, फैजपूर व रावेर शहरातील वाढीव भाग शहरात समाविष्ट होणार असून शासनाकडूलन लवकरच त्याबाबत निर्णय होणार असून हद्दवाढीसोबतच विकासासाठी निधीदेखील मिळणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले.
कुर्हा व खडक्यात सोलर प्लँटची निर्मिती -आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, वीज निर्मितीसाठी प्रचंड खर्च येतो शिवाय त्यामुळे शेतीवर विपूल परीणाम होवून प्रदूषणाची समस्या उद्भवते त्यामुळे अपारंपरीक उर्जा साधनांचा वापर वाढवण्यावर केंद्र शासनाने गती दिली आहे. तालुक्यातील कुर्हा व खडका भागात सोलर प्लँटची निर्मिती केली जात असल्याचे त्यांनी सांगत भुसावळातील या योजनेमुळे वीज बिलात मोठी बचत होणार आहे. तत्कालीन सत्ताधार्यांच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित आल्याने शहरवासीयांना अत्यंत वाईट अनुभव आले होते मात्र आता तशी वेळ येणार नाही. जिल्ह्यातील चार पालिकांमध्ये प्रथमच ही योजना राबवली जात आहे. बचत होणार्या निधीतून खर्चात बचत होणार आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहरवासीयांना त्रास होत असल्याची बाब मान्य आहे मात्र अमृत योजनेची पाईप लाईन अंथरल्यानंतर रस्त्यांच्या कामांना निश्चित सुरूवात होईल, असे आमदार म्हणाले. शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर अंडर ग्राऊंड केबल टाकण्यासंदर्भात माजी मंत्री खडसेंनी लक्ष घातल्यास पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही, असे सांगत जळगाव महापालिका भाजपाच्या ताब्यात आल्याने खडसेंच्या संघर्षाला यश आल्याचे त्यांनी नमूद केले. जळगाव महापालिकेतील उर्जा बचतीची योजना राबवल्यास कर्जाच्या ओझ्याखालील महापालिकेचे निश्चित कर्ज कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
50 टक्के वीज बिलात होणार बचत -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, पालिकेच्या निवडणुकीत शहर विकासाची ग्वाही आमचे नेते नाथाभाऊ, खासदार व आमदारांनी दिली होती. दिलेल्या वचनांची आम्ही पूर्ती करणार आहोत. या योजनेमुळे पालिकेच्या वीज बिलात तब्बल 50 टक्के बचत होणार आहे शिवाय त्यामुळे बचतीतील निधीमुळे अन्य विकासकामे करता येणे शक्य आहे. सात वर्षापर्यंत पालिकेचा पथदिवे बदलण्यासह दुरुस्तीचा खर्च आता वाचणार आहे. मूलभूत समस्या सोडवणे ही आमची जवाबदारीच आहे. अमृत योजनेमुळे रस्त्याची अडचण आहे मात्र लवकरच शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागतील. गेल्या काळात शहरवासीयांना अनंत अडचणी सोसाव्या लागल्या मात्र आता परीस्थिती बदलली आहे.
24 तासात लाईट बदलून मिळणार -शरद चंद्र
ईईएसएल लि.सर्व्हिसेसचे डेप्युटी मॅनेजर शरदचंद्र म्हणाले की, सात वर्षांपर्यंत आमची कंपनी पालिकांना सेवा पुरवणार आहे. या काळात एलईडी खराब झाल्यानंतर तो अवघ्या 24 तासात बदलून देता येईल शिवाय व्हीआयपी भागात तर चार तासात बदलण्याची व्यवस्था केली जाईल. या रहिवासी भागात एलईडी बंद पडला त्या भागातून नागरीकांना तक्रार करता येईल त्यासाठी कस्टमर केअर नंबर देण्यात येणार आहे शिवाय या सीसीएमएस सिस्टीमुळे तक्रार जरी नाही आलीतरी पालिकेत असलेल्या सिस्टीममध्ये ज्या भागातील एलईडी बंद पडला आहे त्या भागातून पालिकेतील यंत्रणेला मेसेज प्राप्त होईल शिवाय नागरीकांची तक्रार निवारण्यासाठी पालिकेत कंपनी एका स्वतंत्र कर्मचार्याची नियुक्ती करणार आहे. 44 शहरांमध्ये अशा पद्धत्तीने उर्जा बचतीचे काम सुरू आहे. अमरावतीसह चंद्रपूर, परळी-वैजनाथ, रोहा, श्रीवर्धन आदी शहरांमध्ये काम पूर्ण झाले असून वर्धा व यवतमाळमध्ये लवकरच काम पूर्ण होणार आहे.
सोलर पॅनल बसवा -जिल्हाधिकारी
उर्जा बचतीचा उपक्रमाबाबत आपण जळगाव महानगरपालिकेत प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही, असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सांगत नागरीकांनी अधिकाधिकरीत्या घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवावेत, असे आवाहन त्यांनी केले. चाळीसगाव तालुक्यातील बोढरे व मुक्ताईनगर तालुक्यात सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती होत असल्याचे ते म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, भुसावळ भाजपा गटनेता मुन्ना तेली, भुसावळ मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, सावदा मुख्याधिकारी अनिता येवले, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, बोदवड नगराध्यक्ष पती सईद बागवान, सावदा मुख्याधिकारी सौरव जोशी, ईईएसएल लि.सर्व्हिसेसचे डेप्युटी मॅनेजर शरदचंद्र, सिनीयर इंजिनिअर सागर मिश्रा, बोदवड मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले. कार्यक्रमास शहर व विभागातील भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.