भुसावळसह यावलमध्ये रावणदहनाची जय्यत तयारी

0

भुसावळ । भुसावळसह यावलमध्ये रावण दहणासाठी आयोजकांनी जोरदार तयारीला वेग दिला आहे. भुसावळ येथील टीव्ही टॉवर मैदानावर दरवर्षी रावण दहन कार्यक्रम मोठ्या जल्लोषात होतो. यावेळी होणारी आतषबाजी ही तालुकावासीयांसाठी विशेष आकर्षण असल्याने हजारोंच्या संख्येने लोक येथे येतात.

यावलमध्ये जोरदार तयारी
यावल शहरातील शिवाजी नगरात रावण दहण कार्यक्रमासाठी आयोजकांनी तयारीला वेग दिला आहे. आमदार हरीभाऊ जावळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक परदेशी, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, रवींद्र पाटील, आर.जी.पाटील यांच्यासह पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित राहतील, असे आयोजक समितीचे अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी कळवले आहे.

भुसावळात तासभर आतिषबाजी
शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर दरवर्षी जय मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे रावण दहनाचा कार्यक्रम होतो. यंदादेखील रावणासह मेघनाथ व कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. भगवान खरारे हे दरवर्षी तिघांचे पुतळे बनवतात. या व्यवसायात ही त्यांची दुसरी पिढी कार्यरत आहे शिवाय यंदा मध्यप्रदेशातील हरदा येथून आकर्षक फटाके आणण्यात येणार आहेत. सुमारे तासभर आकर्षक होणारी आतषबाजी शहर व तालुकावासीयांसाठी आकर्षण ठरणार आहे. कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी, किरण कोलते आदींची उपस्थिती राहणार आहे. उत्सवासाठी मैदानाच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली आहे.