भुसावळ : नगरपरीषदेच्या प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता त्या-त्या प्रभाग निहाय अनुसूचित जाती-जमाती व महिलांसाठी ची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडत भुसावळसह यावल नगरपालिका कार्यालयात सोमवार, 13 जून रोजी काढण्यात येणार आहे. दरम्यान, काढण्यात आलेल्या आरक्षणावर 15 ते 21 जून दरम्यान हरकती नोंदवता येणार आहे.
भुसावळात 25 प्रभागातून 50 नगरसेवक निवडून येणार
भुसावळ पालिकेची आरक्षण सोडत सोमवारी दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी कार्यालयात निघणार आहे. नवीन रचनेनुसार 25 वॉर्डातील 50 नगरसेवक निवडून येणार आहेत. सोमवारी दुपारी दोन वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत निघेल. शहरात यापूर्वी 24 प्रभाग व 48 नगरसेवक होते, आता 25 प्रभाग व 50 नगरसेवक असतील. यापैकी 8 जागा मागासवर्गीय जाती तर 2 जागा अनूसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत. यात पाच जागा महिलांसाठी आरक्षीत असतील. उर्वरीत 40 जागा या सर्वसाधारण असतील. यातील 20 जागा या महिलांसाठी राखीव असतील. अर्थात एकूण 50 जागांपैकी 25 जागा महिलांसाठी आरक्षित असतील.
यावलला आरक्षण सोडतीकडे लागले लक्ष
यावल नगरपरीषदेची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केली आहे. शहरात नव्याने निर्माण झालेल्या 11 प्रभागातील 23 जागांसाठीचे आरक्षण काढले जाणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण निश्चित आहे. आरक्षण सोमवार, 13 जून रोजी सकाळी 11 वाजता यावल नगरपरीषदेच्या सभागृहात काढले जाणार आहे तसेच या काढण्यात आलेल्या आरक्षणावर 15 जून ते 21 जून दरम्यान नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहे. उपस्थितीचे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी केले आहे.