भुसावळसह बोदवड, रावेर कडकडीत बंद तर मुक्ताईनगरात रस्ता रोको

0

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर ठाम ः व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने ठेवली बंद

भुसावळ- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी क्रांतीदिनी गुरुवार, 9 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून या बंदला भुसावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे चित्र आहे. भुसावळसह बोदवड, रावेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून मुक्ताईनगरासह पूरनाड फाट्यावर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, बंदमुळे ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.च्या फेर्‍या काही ठिकाणी रद्द करण्यात आल्याने बसस्थानकांमध्ये नीरव शांतता असल्याचे चित्र दिसून आले.

यावल शहर सुरळीत : दुपारी ठिय्या आंदोलन
मराठा समाजास शासनाने तत्काळ आरक्षण घोषीत करावे यासाठी यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार, 9 ऑगष्ट रोजी यावल येथील भुसावळ टी पॉईंटवर दुपारी दोन वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे मात्र शहरात बंद पाळण्यात आलेला नाही. शहरातील व्यापारी पेठेत दुकाने सुरळीत सुरू आहेत. मात्र शहरातील बसस्थानकातील बसस्थानक सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र असून बस फेर्‍या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

भुसावळ कडकडीत बंद
भुसावळ- शहरात व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला असून शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुटी असल्याने विद्यार्थ्यांनी गुरुवारी घरीच राहणे पसंत केले. सकाळी 11 वाजेपासून सकल मराठा समाजातर्फे नाहाटा महाविद्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. जामनेर रोड, अष्टभूजा देवी चौक, अप्सरा चौक, भारत मेडिकल, मरीमाता मंदिर, मोठी मशीद, रेल्वे लोखंडी पूल, वसंत टॉकीज, तहसील कार्यालय व नंतर प्रांताधिकारी कार्यालयाजवळ रॅलीचा दुपारी 12 वाजता समारोप झाला. बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे तर बसेससह खाजगी वाहतूकदारांनी फेर्‍या बंद ठेवल्याने बस स्थानक परीसरात शुकशुकाट दिसून आला. भुसावळ विभागाचे उपअधीक्षक गजानन राठोड यांनी शहरातील बंदोबस्ताची पाहणी करीत कर्मचार्‍यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. शहरात केवळ अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल दुकाने सुरू असल्याचे चित्र होते.

मुक्ताईनगरात रस्ता रोको
मुक्ताईनगर- आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मराठा बांधवांनी पूरनाड फाट्यासह मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस निरीक्षक अशोक कडलग परीस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. शहरातील बससेवा ठप्प झाली असून व्यावसायीकांनी दुकाने बंद ठेवली असून शहरातील पेट्रोल पंपही बंद असल्याने वाहनधारकांची काहीशी गैरसोय झाली.

निंभोर्‍यात रस्ता रोको
निंभोरा- आरक्षणाच्या मागणीसाठी येथे रस्ता रोको आंदोलन करून रस्त्यावरच ठिय्या मांडण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला लहान मुलीच्या हातुन पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर छत्रपतींच्या जयघोषाने परीसर दणाणला. सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर भादंवि 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रल्हाद बोंडे, रोहिदास शेठ ढाके, पंचायत समिती दीपक पाटील, आंबेडकरी चळवळीचे विचारवंत मनोहर तायडे, तुषार कोंडे, पी.के.चौधरी, परीट समाजाच्या वतीने काशीनाथ शेलोडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच डिगंबर चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती दुर्गादास पाटील
वाय.डी.पाटील, चेतन पाटील, नितीन पाटील , सर्फराज खान, सचिन चौधरी, सचिन पाटील, राहुल सोनार, सचिन कोळी, आरीफ खान उपसरपंच सुभाष महाराज, तुळशीराम कोळी व समाजबांधव सहभागी झाले. सूत्रसंचालन राजीव बोरसे यांनी केले. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर पाकळे व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला.