भुसावळसह वरणगाव ऑर्डनन्सचे कर्मचारी देशव्यापी संपावर

0

पोलिस प्रशासनाने राखला कडेकोट बंदोबस्त ; सचिवांसोबतची बैठक ठरली विफल

भुसावळ : केंद्र सरकारच्या ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात एआयडीईएफ, आयएनडीडब्लूएफ, बीपीएमएस व स्टॉप संघटनेच्या सीडीआरए यांनी मंगळवारपासून संपाची हाक दिल्यानंतर भुसावळ शहरासह तालुक्यातील वरणगावातील ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचार्‍यांनी संपावर उतरल्याने उत्पादन ठप्प पडले आहे. 30 दिवसीय संप पुकारण्यात आला असून पहिल्याच दिवशी संपाला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. या संपामुळे दोन्ही फॅक्टरींचे सुमारे 38 कोटी रुपयांचे उत्पादन ठप्प होणार असल्याचे सांगण्यात आले. भुसावळ आयुध निर्माणीत संरक्षण क्षेत्रातील तिन्ही फेडरेशनसह स्टॉप संघटनांनी सहभाग नोंदवला.

सर्व युनियनचा उत्स्फूर्त सहभाग
आयुध निर्माणी भुसावळात कामगार युनियन, इंटक युनियन, बीपीएमएस, बीएसकेएस, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी असोसिएशन, क्लरिकल असोसिएशन, सुपरवायझर असोसिएशन, एनजीओ असोसिएशन ने संपात सहभाग घेतला. काही राजपत्रिक अधिकारी मात्र कामावर गेले. संयुक्त संघर्ष समितीने अत्यावश्यक सेवेला संपातून सुट दिली. इलेक्ट्रिकल मेंटनन्स, पाणीपुरवठा, हॉस्पीटल, मोटार ट्रान्सपोर्ट आदी विभागांमध्ये कर्मचारी स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहेत.

वरणगाव फॅक्टरी कर्मचारीही सहभागी
केंद्र सरकार आयुध निर्माणीचे कार्पोरेशन करून खाजगीकरण करण्याच्या तयारीत असल्याने वरणगांव फॅक्टरीतील कामगार युनियन, इंटक युनियन व भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ या तिन्ही मान्यताप्राप्त संघटनांचे पदाधिकारी श्रीनिवासन, मुकेश सिंग, श्रीकुमार यांची रक्षा सचिवांसोबत 14 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत काहीही तोडगा न दिल्यानंतर मंगळवारपासून संप छेडण्यात आला. जिल्ह्यातील दोन्ही भाजपा खासदारांनी मौन पाळले असतानाच भाजपा विचारधारा असलेली भारतीय मजदूर संघही संपात सहभागी आहे. शांततापूर्ण मार्गाने संप यशस्वी करण्याचे आवाहन कामगार संघटनेने केले आहे.

यांचे संप यशस्वीतेसाठी परीश्रम
संप यशस्वीतेसाठी बी.बी.सपकाळे, शरद पाटील, देवेंद्र साळुंखे, महेश पाटील, रवी देशमुख, किरण पाटील, सुनील महाजन, विशाल भालशंकर, राजेंद्र शेटे, प्रवीण पाटील, गणेश भंगाळे, के.के.सिंग, सुधीर गुरचल, सचिन झोपे, लक्ष्मण तायडे, संतोष बार्‍हे, मनीष महाले, सुहास विभांडीक, दीपक पाटील, वाल्मिक खोरकड, प्रशांत ठाकूर, रवी बोरसे, डी.एम.पाचपांडे, योगेश सुर्यवंशी, हर्षल सुतार, महेश देशमुख, निलेश घुले, जयश्री झोपे, योगेश ठाकरे, अर्चना बोरोलेंसह कामगार, इंटक , भा.म. संघाचे कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.