भुसावळहुन मुंबईसाठी सुरतमार्गे विशेष एक्स्प्रेस धावणार

0

मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांची ग्वाही ; पीजे मार्ग बोदवडपर्यंत वाढवून ब्रॉडगेज होणार ; ईगतपुरी-बडनेरामार्गे गाड्यांमुळे वाहतूक समस्या सुटणार

भुसावळ- भुसावळहून थेट मुंबईसाठी लवकरच एक्स्प्रेस गाडी सुरू होणार असून भुसावळ-जळगाव-सुरतमार्गे ती बांद्रापर्यंत धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी येथे दिली. शुक्रवारी दिवसभर शर्मा यांनी भुसावळ विभागाचा दौरा केला तसेच विविध कामांचे उद्घाटनही केले. सायंकाळी 7.30 वाजता जीएम स्पेशल एक्सप्रेसचे भुसावळात आगमन झाल्यानंतर शर्मा यांनी रेल्वे स्थानकाबाहेर ठेवलेल्या रणगाड्याचे उद्घाटन केले तसेच रनिंग रूमची तसेच बसस्थानकाजवळील रेल्वेच्या हेरीटेजची पाहणी केली. रात्री उशिरा त्यांनी डीआरएम कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.

भविष्यात ताशी 125 किलोमीटर वेगाने एक्स्प्रेस धावणार
रेल्वे गाड्यांना होणारा विलंब पाहता प्रवास जलद व अधिक सुखद होण्यासाठी भविष्यात ताशी 125 किलोमीटर वेगाने रेल्वे गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती शर्मा यांनी दिली. शुक्रवारी बडनेरा-भुसावळ दरम्यान वेगाची चाचणी घेण्यात आली. याबाबत शर्मा म्हणाले की, या मार्गावर उन्हाळा तसेच पावसाळ्यात रूळात बदल (रूळ आखुडणे-प्रसरण पावणे) होत असल्याने नव्याने टाकण्यात येत असलेल्या रेल्वे लाईनमध्ये नव्या पद्धत्तीने अवलंब केला जात आहे त्यामुळे अप्रिय घटनांना निश्‍चित आळा बसेल, असे ते म्हणाले. भुसावळहून थेट मुंबईसाठी पूर्वी गाडी असलीतरी प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी ती बंद करण्यात आली मात्र आता पुन्हा भुसावळहून थेट मुंबईसाठी भुसावळ-जळगाव-सुरतमार्गे बांद्रापर्यंत एक्स्प्रेस चालवली जाईल, याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शवली. पाचोरा-जामनेर मार्ग ब्रॉडगेज करण्याबाबत मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्यास मंजुरी मिळताच प्रत्यक्षात कामाला सुरूवात होईल शिवाय हा मार्ग बोदवडपर्यंत वाढवून पुढे थेट ईगतपुरी-बडनेरापर्यंत गाडी चालवली जाईल त्यामुळे जळगाव मार्गावरील वाहतूक कमी होईल, असेही शर्मा म्हणाले.

डीआरएम यांचे कार्य गौरवास्पद -शर्मा
भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांचे कार्य गौरवास्पद असून त्यांच्या काळात रेल्वे स्थानकाने कात टाकली असून एकमेव भुसावळात रणगाडा स्थानकाच्या दर्शनी भागात ठेवण्यात आल्याने भुसावळकरांसाठी ही बाब गौरवशाली असल्याचे ते म्हणाले. भुसावळ हा मध्य रेल्वेचा हार्ट असून भुसावळ विभागातील आठ स्थानकावर उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याचे ते म्हणाले.

भुसावळ विभागाची सरव्यवस्थापकांनी केली पाहणी
शुक्रवारी पहाटे बडनेरा रेल्वे स्थानकावर जीएम स्पेशल ट्रेनचे आगमन झाले. रेल्वेस्थानकाच्या पाहणीनंतर इंजिनिअरींग कार्यालयाचे उद्घाटन, मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अ‍ॅक्सीडेंट रीलिफ ट्रेनचे निरीक्षण तसेच बोरगाव स्थानकाचे निरीक्षण, अकोला रेल्वे स्थानकाचे निरीक्षण, नवीन आरआरची पाहणी, प्रवाशांसाठी असलेल्या हिंदी लायब्ररीचे उद्घाटन, त्यानंतर शेगाव स्थानकाचे निरीक्षण शुक्रवारी शर्मा यांनी केले. पाहणी दौर्‍यात डीआरएम आर.के.यादव यांच्यासह रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला आरपीएफ डीजी ए.के.श्रीवास्तव, डीआरएम आर.के.यादव, महाप्रबंधक देवेंद्रकुमार शर्मा, एडीआरम मनोज सिन्हा, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी, प्रीन्सीपल चीफ इंजिनिअर एस.पी.वावरे, प्रधान मुख्य परीचालन प्रबंधक डी.के.सिंग, प्रीन्सीपल चीफ कमर्शियल शैलेंद्र कुमार, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस.के.तिवारी, मुख्य अभियंता एस.के.अग्रवाल, प्रीन्सीपल चीफ पर्सनल अधिकारी एन.स्वामीनाथम, प्रीन्सीपल चीफ मेकॅनिकल इंजिनिअर मनोज जोशी, आदींची उपस्थिती होती.