भुसावळातील अग्रसेन व हंबर्डीकर चौकात वाहतुकीची कोंडी

0

भुसावळ- शहरातील पांडुरंग टॉकीज लगतच्या महाराजा अग्रसेन चौकात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाल्याने वाहनधारकांना अडचणीचा सामना करीत मार्गक्रमण करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील मुख्य वाहतूकीच्या जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज लगतच्या अग्रसेन चौकातून यावल, रावेर व जळगाव आदी गावांकडे खाजगी वाहतूकदार प्रवाशांची वाहतूक करतात शिवाय रस्त्याच्या मध्यभागी वा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धत्तीने वाहने लावत असल्याने पादचार्‍यांसह वाहनधारकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. बसस्थानकावरून सुटणार्‍या बसेसही या चौकातून प्रवाशांची उचल करण्यासाठी थांबत असल्याने या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होते. याच प्रमाणे शहराच्या उत्तर भागाकडे जाणार्‍या मार्गावरील हंबर्डीकर चौकात देखील वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या चौकातील वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

शिवाजीनगर रोडवरही वाहतुकीची समस्या
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोरून शिवाजी नगर व वरणगावकडे जाणार्‍या मार्गावरील वळणावरही मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने या भागात वाहतूक पोलिसाची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.