6 जूनपर्यंत अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवण्याचे सत्र न्यायालयाचे आदेश ; मोहिम काही दिवसांसाठी लांबणीवर
भुसावळ- रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात 16 ते 19 दरम्यान मोहिम निश्चिती झाल्यानंतर मंगळवारी या प्रकरणी दाखल याचिकेवर भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयातील दुसरे मुख्य न्यायाधीश पी.आर.सित्रे यांनी 6 जूनपर्यंत अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्याने अतिक्रमण धारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनासह पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीवर पुन्हा यामुळे पाणी फेरले गेले आहे. 16 पासून रेल्वे प्रशासनाने रेल्वे जागेवरील झोपडपट्टी तसेच दुकाने हटवण्यासाठी मोहिम आखली होती तर त्यासाठी तब्बल 500 जवांनाचा बंदोबस्तही लावण्यात आला होता मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे मोहिम लांबणीवर पडली असून अतिक्रमण धारकांना दिलासा मिळाला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड.डी.डी.शंकपाळ यांनी बाजू मांडली.
पाचव्यांदा मोहिमेला लागला बे्रक
तब्बल वर्षभरापासून विविध कारणांमुळे रेल्वे अतिक्रमण हटवण्यास चार वेळा ब्रेक लागला होता तर मंगळवारी न्यायालयाने पुन्हा अतिक्रमण जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याने पाचव्यांदा मोहिम लांबली आहे. सोमवारी डीआरएम यांच्या कार्यालयात अतिक्रमण बचाव संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली होती तर उभयंतांना दोन दिवसांची मुदतही देण्यात आली होती. संबंधितानी जागा खाली करावी व सामान वाहतुकीसाठी ट्रॅक्टर देण्याचेही मान्य करण्यात आले होते मात्र मंगळवारी या भागातून कुणीही अतिक्रमण हटवले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अतिक्रमण हटवले तर होईल अन्याय
न्या.पी.आर.सित्रे यांच्या न्यायालयात अतिक्रमणप्रश्नी याचिका छोटेलाल हरणे यांनी दाखल केली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर दिलेल्या अपिलावर सुनावणी प्रलंबित असताना अतिक्रमण हटवले गेल्यास अन्याय केल्यासारखे होईल, असे मत न्यायालयाने नोंदवत अतिक्रमण 6 जुनपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. रेल्वे उत्तर वॉर्डातील छोटूलाल हरणे, फारूक अ.अजीज, जितेंद्र नामदास, अमर शिरसाठ, शुभम काळखैरे व अन्य रहिवाशांनी या प्रकरणी याचिका (37/2018) दाखल केली आहे. छोटूलाल हरणे यांना माजी आमदार संतोष चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे यांचे सहकार्य लाभत आहे.