रेल्वे परीसरातील झोपडपट्टी धारकांना तूर्त दिलासा
भुसावळ- रेल्वेच्या हद्दीतील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने 18 ते 21 दरम्यान मोहिम आखली असताना भुसावळ सत्र न्यायालयाने या संदर्भात दाखल दाव्यातील अर्जानुसार पुढील आदेश येईपर्यंत अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्याने शहरातील झोपडपट्टी धारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. दरम्यान, न्यायालयाने हा दावा चालवण्याचे न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे वा नाही, असा प्राथमिक मुद्दा सीपीसी कलम 9 अ अन्वये काढला असून याबाबत निर्णय झाल्यानंतर पुढील निर्णय न्यायालय सुनावणार आहे.
अतिक्रमितांना मिळाला तूर्त दिलासा
रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली असून यापूर्वीच संबंधिताना नोटीसा बजावून झोपडपट्टी तसेच दुकाने खाली करण्याचे बजावण्यात आले आहे मात्र रेल्वे उत्तर भागातील रहिवाशांनी या संदर्भात मनाई हुकूम याचिका (दावा) दाखल केली असून त्यानुसार सोमवारी अॅड.डी.डी.शंकपाळ यांनी युक्तीवाद केला. 16 रोजी दोन्ही पक्षांनी युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने वादींचा ‘स्टेटस को’ (जैसे थे) चा अर्ज मंजूर केला. रेल्वे अतिक्रमण हटवू नये या संदर्भात छोटेलाल हरणे, फारूक कुरेशी, जितेंद्र नामदास व इतर रहिवाशांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने अॅड.डी.डी.शंकपाळ काम पाहत आहेत.