भुसावळ- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग व पंधरा बंगला भागातील रेल्वेने काढलेल्या अतिक्रमण धारकांचे शासनाने तत्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी आमदार संजय सावकारे यांनी मुंबई येथे सोमवारपासून सुरू झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी लक्षवेधी सुचनेद्वारे मांडली. आमदार सावकारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेत हद्दिवाली चाळ, चांदमारी चाळ, आगवाली चाळी आदी भागात रेल्वे विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून वास्तव्यास असलेल्या सुमारे एक हजारांपेक्षा जास्त कुटूंब उघड्यावर पडले असून या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या पुनर्वसनासाठी शासकीय भुखंड किंवा एमआयडीसीच्या खुल्या भुखंडाची मागणी केली होती. अतिक्रमण हटवतांना बाधीत कुटुंबासाठी कुठेही पर्यायी जागा देऊन पुनर्वसन न करणे, लहान मुले व वृद्ध व सर्वसामान्यांचे झालेले हाल, उघड्यावर पडलेले संसार त्यामुळे पसरलेला असंतोष व शासनाप्रती निर्माण झालेली चीड यावर लक्षवेधी सुचनेद्वारे मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे लक्ष वेधले.