झारखंड राज्यातील दोन संशयीत पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ- शहरात आठवडे बाजारातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 20 जणांचे मोबाईल लांबविल्याच्या वेगवेगळ्या घटना 21 रोजी सकाळी 11 ते 12.30 वाजे दरम्यान घडल्याने खळबळ उडाली. भुसावळ येथील प्रदीप निळकंठ पाटील, कडू नारायण पाटील, पद्माकर दिनकर कुळकर्णी,प्रकाश यशवंत पेठारे,मुकेश कौतिक फिरके,लोटन आनंदा सोनवणे आदी मंडळी रविवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल लांबविले. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेेठचे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे कर्मचारी तत्काळ बाजारात दाखल झाले. संशयावरून त्यांनी झारखंड राज्यातील राहुल बहादुर नेमीया (वय 21) व अन्य एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेेत त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे प्रदीप पाटील यांचा मोबाईल आढळला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यातुन एक मोठी मोबाईल चोरणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.