भुसावळातील एआयएमआयएम पदाधिकार्‍यांचे राजीनामे

पक्षाच्या ध्येयधोरणाला कंटाळल्याचा ठपका : पत्रपरीषदेत माहिती

भुसावळ : ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात ‘एआयएमआयएम’ पक्षाच्या शहरातील पदाधिकार्‍यांनी पक्षाच्या ध्येयधोरणाला कंटाळून राजीनामे दिले आहेत. याबाबतची माहिती शनिवारी उत्तर महाराष्ट्र सचिव फिरोज रहमान शेख यांनी पत्रकार परीषदेत दिली.

पक्ष कार्याची दखल नाहीच
फिरोज शेख यांनी पत्रकार परीषदेत सांगितले की, गेल्या सहा वर्षांपासून एकनिष्ठपणे पक्षाचे काम करत आहोत मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही. जिल्हाध्यक्ष हे मनमानी करतात. या प्रकाराला कंटाळून माझ्यासह रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष अशरफ हयात तडवी, माजी युवा जिल्हाध्यक्ष नावीद खान, जिल्हा सहसचिव मेहमूद पठाण, कलीम शेख, माजी युवा शहराध्यक्ष इलियाज पटेल, भुसावळ तालुका उपाध्यक्ष अफजल खान, युवा तालुकाध्यक्ष नदीम शेख, रावेर लोकसभा सचिव वसीम शेख, रशीद शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष खालीद प्रवेश, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.जफ्फार कादरी, प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडे राजीनाम्याच्या प्रती पाठवणार आहोत.