प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
भुसावळ : शहरातील ऑफसेटसह प्रिंटींग दुकानांना केवळ आठवड्यातून दोन दिवस परवानगी मिळाली असल्याने आणखी दोन दिवस परवानगी मिळावी, अशी मागणी प्रिटींग प्रेस चालकांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे सोमवारी लेखी निवेदनाद्वारे केली.
प्रिटींग प्रेस चालकांसह कामगारांवर उपासमारीची वेळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातून दोन दिवस व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून शनिवारी भारनियमन होत असल्याने या दिवशी कोणतही काम केले जात नाही तर प्रिंटर्स बांधवांनी बँकांकडून कर्ज घेऊन मशीन व कॉम्प्युटर सेटअप लावल्याने कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नाही शिवाय काही व्यावसायीकांची दुकाने भाड्याने असल्याने भाडे भरणे शक्य होत नाही व तीन महिने झाले लाईट बिल सुध्दा भरण्यात आलेले नाही. प्रिंटीग प्रेस चालकांसह कामगारांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. प्रिंटींग प्रेस चालक सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून काम करतात शिवाय ग्राहकाला दुकानावर थांबवून गर्दी न करता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मॅटर मागून डिझाईन पाठवून नंतर प्रिंट दिली जात आहे त्यामुळे आठवड्यातून जास्तीत जास्त दिवस परवानगी द्यावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अनिल वि. चौधरी (फ्रेंड्स डिजिटल), नितीन नवगाळे (तेजस इंटरप्राईजेस), मंगला पाटील (कुशल ऑफसेट प्रिंटर्स), राजेश पाटील (क्रेझी क्रिएशन), प्रकाश चौधरी (वैष्णवी क्रिएशन), रोहित साहनी (रोहित ऑफसेट), महेश पिंजानी (साईबाबा डिजिटलत्र, अविनाश पाटील (अशा प्रिंटर), हेमंत जोशी (हेरंभ आर्ट), भारत बदलानी (इंडिया प्रिंटिंग हाऊस), अमोल चोपडे (ओम ऑफसेट), आदी उपस्थित होते.