भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या बंद असतानाच चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री पुन्हा पोलिसांच्या गस्तीला आव्हान देत विरळ वस्ती असलेल्या शिवपूर-कन्हाळे भागातील बंद घरात घरफोडी करून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या वाढदिवसाला सलामी दिली. एका बचत गटाच्या कार्यालयातील तिजोरी चोरट्यांनी फोडली मात्र त्यात सुदैवाने ऐवज नसल्याने चोरट्यांनी दुसरीकडे मोर्चा वळवला मात्र चोरट्यांच्या पावलांचा शेजारच्या महिलेला आवाज आल्याने चोरट्यांचा बेत हुकला. बाजारपेठ पोलिसात एका घरफोडीत 65 हजारांचा ऐवज चोरीला गेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी प्रभावी गस्त केल्याने चोर्यांना आळा बसला होता मात्र जिल्हा दौर्यावर आलेल्या अपर पोलीस महासंचालकांच्या अखेरच्या दिवशीच्या दौर्यातच भुसावळात धाडसी घरफोडी झाल्याने खळबळ
उडाली आहे.
ओम पार्कमध्ये चोरीचा प्रयत्न फसला
ओम पार्क, फेज वन परीसरातील रहिवासी व रेल्वेतील कर्मचारी विशाल भामरे यांच्याकडे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र याच भागातील रहिवासी असलेल्या महिलेला जाग कुलूप तोडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आरडा-ओरड करताच चोरट्यांनी पळ काढल्याने चोरी टळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चोरट्यांची संख्या तीन होती व त्यांनी पँट-शर्ट परीधान केला होता. पाच फूट उंची असलेल्या चोरट्यांनी नागरीकांनी हल्ला चढवल्यास भामरे यांच्या बंगल्याच्या संरक्षक कुंपणावर दगडही आणून ठेवले होते मात्र आरडा-ओरड झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. चिकू मळा परीसरातील तीनही घटनांमध्ये तीनही चोरटे तेच असावेत, असा कयास वर्तवला जात आहे.
मयत पोलिसाच्या पत्नीच्या घरी चोरी
शिवपूर-कन्हाळा रोड, चिकुचा मळा भागातील समर्थ कॉलनीत कलाबाई उत्तम सुरवाडे (60) या वयोवृद्धा राहतात. पोलीस दलात असलेल्या त्यांच्या पतीचे गेल्या तीन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. 10 डिसेंबर 2017 रोजी त्या जळगाव राहत असलेल्या मोठी मुलगी नीताकडे गेल्या होत्या. चोरट्यांनी संधी साधत घरातील कपाटातील लॉकरमधील दोन तोळे वजनाची व जुन्या किंमतीनुसार 36 हजार रुपये किंमतीची पोत, नऊ हजार रुपये किंमतीची व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच 20 हजारांची रोकड मिळून 65 हजारांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाच कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला. गुरुवारी घराशेजारील इंगळे नामक महिलेने घराचा दरवाजा उघडा दिसल्याने सुरवाडे यांना सूचित केल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली.
बचत गटाची तिजोरी फोडली, रक्कम नसल्याने दिलासा
चिकूचा मळा परीसरातील विनायक कॉलनी, मोहन नगरातील कृष्णा बचत गटाच्या कार्यालयाची तिजोरी चोरट्यांनी फोडल्याची माहिती आहे मात्र सुदैवाने या तिजोरीत रक्कम नसल्याने बचत गटाला मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, या भागातील बचत गटाकडे दिवसभर अनेक अनोळखी लोक येत असून ते घोळक्यानेदेखील बसत असल्याने कोण कुठला व कोणत्या कामासाठी आला हे देखील कळणे कठीण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी तक्रार केल्यास दमदाटी केली जाते, असा आरोप काही रहिवाशांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा या भागातील नागरीकांनी केली आहे.