भुसावळातील खुनाचा आठ तासात उलगडा : तिघे आरोपी जाळ्यात
किरकोळ वाद बेतला युवकाच्या जीवावर : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची पत्रकार परीषदेत माहिती
भुसावळ : भुसावळात शहरातील लिम्पस क्लब रीक्षा स्टॉपजवळ 34 वर्षीय युवकाची दगडाने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनी अत्यंत बारकाईने गुन्ह्याचा तपास करीत आठ तासात गुन्ह्याची उकल करून तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. खुनामागे अद्याप ठोस कारण निष्पन्न झाले नसलेतरी मद्यप्राशन करताना शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी हा खून केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे मात्र सर्वच बाजूने पोलिसांकडून तपास केला जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परीषदेत दिली. या घटनेत आरोपींनी संदीप एकनाथ गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या युवकाचा खून केला होता. पत्रकार परीषदेला शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहा.निरीक्षक संदीप दुणगहू उपस्थित होते.
या आरोपींना केली अटक
युवकाच्या खून प्रकरणी संदीप एकनाथ गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या इसमाच्या खून प्रकरणी अजय अशोक पाठक (19, ऑर्डनन्स फॅक्टरी परीसर, भुसावळ), पंकज संजय तायडे (19, राहुल नगर, भुसावळ) व आशिष श्रीराम जाधव (19, श्रीराम नगर, भुसावळ) या संशयीतांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मयत व अटकेतील आरोपींची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूतमी नाही, केवळ किरकोळ वादातून त्यांनी हा खून केल्याची बाब तपासात पुढे आली आहे. शिवाय मयत व आरोपी हे प्रतिकुल परीस्थितीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचा बाबही समोर आली आहे.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अर्चित चांडक, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुणगहू, शहर व बाजारपेठचे हवालदार राजेश बोदडे, हवालदार संजय सोनवणे, हवालदार मो.वली सैय्यद, सोपान पाटील, जुबेर शेख, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
एकमेकास हटकल्यावरून उफाळला वाद
लिम्पस क्लब रीक्षा स्टॉपजवळील मोकळ्या जागेवर तीनही संशयीत मद्य प्राशन करीत असताना त्या जागेजवळून संदीप गायकवाड (34) हा युवक देखील जात होता व चौघांमध्ये शाब्दीक वाद विकोपाला जात असतानाच तिघा युवकांनी जमिनीवर असलेल्या दगडांनी संदीप गायकवाड यास मारहाण केली व या मारहाणीत त्याचा रात्री 11.30 वाजेच्या सुमारास मृत्यू ओढवला. मृतदेह रात्रभर घटनास्थळी पडून होता तर खुनानंतर आरोपी पसार झाले. सकाळी सुरक्षा बलाने आठ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपासचक्रे गतिमान झाली. मयत व संशतांमध्ये वाद होताना काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्या उघड झाल्यानंतर सुरुवातीला एका संशयीताला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आल्यानंतर अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. आरोपींच्या कबुली जवाबासह रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपास करून देखील अन्य बारकाईने या गुन्ह्याचा तपास होईल, असे वाघचौरे म्हणाले.
गुन्हेगारीत घट : पोलिसींगवर भर : पोलिस उपअधीक्षक
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शहरातील गुन्हेगारीत घट झाली आहे. गुन्हा दाखल करण्याच्या प्रमाणात आम्ही वाढ केली असून कुठल्याही तक्रारदाराला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे, असे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. 30 टक्के गुन्हेगारी घडल्याचा दावादेखील त्यांनी केला. अचानक घडणार्या घटना टळण्यासाठी पोलिसींग वाढवण्यात आल्याचेही ते म्हणाले.