भुसावळातील खून प्रकरण : संशय बेतला विवाहितेच्या जीवावर
भुसावळातील खूनाची चार तासात उकल : भुसावळ पालिकेतील कंत्राटी कर्मचारी असलेल्या आरोपी पतीला अटक
भुसावळ : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय भुसावळातील विवाहितेच्या खुनाला कारणीभूत ठरला. संशयीत आरोपी तथा पती असलेल्या शुभम चंदन बारसे (26, कवाडे नगर, भुसावळ) याच्या खुनाच्या काहीच वेळेनंतर पोलिसांनी मुसक्या आवळत खुनाच्या गुन्ह्याची उकल केली. शहरातील गुन्हेगारी काही केल्या थांबायला तयार नाही. भुसावळ शहर पोलिस ठाणे हद्दीत या वर्षात झालेला हा तिसरा खून आहे. किमान नव्या वर्षात शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, अशी अपेक्षा शहरवासी व्यक्त करीत आहेत.
दाम्पत्यामध्ये होते वितुष्ट
खुनातील मयत सुचिता बारसे (25) या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी शुभम बारसे यांच्याशी विवाह केला होता मात्र या दाम्पत्यात सातत्याने होणार्या वादाला कंटाळून सुचिता यांनी दोन व चार वर्षीय मुलाला घेवून घर सोडत नातेवाईकांकडे आश्रय घेतला होता. पहिल्या पतीपासून असलेला चार वर्षीय मुलगा व दुसर्या पतीपासून असलेल्या दोन मुलांना सांभाळ करणार्या सूचिता यांनी मध्यंतरी दवाखान्यातही नोकरी केली मात्र नंतर त्यांनी काम सोडले मात्र संकटांची मालिका त्यांच्यापुढे थांबलेली नव्हती. मंगळवारी रात्री त्यांचे पतीशी संभाषण झाले व त्यांनी मुलाला घेवून जाण्याची विनंती केली. पतीने मुलाला पत्नीच्या ताब्यातून घेत घरी सोडले व पुन्हा पत्नीला घेण्यासाठी ते आले मात्र ठार मारण्याची खुनगाठ बांधूनच.
चाकूचे दहा वार नंतर गळाही आवळला
आरपीडी रस्त्यावर सात नंबर पोलिस चौकी असून या चौकीमागे घनदाट जंगल असल्याने संशयीत आरोपीने मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमाराला पत्नीला या भागात नेले. येथेदेखील त्यांचे खटके उडाले व पतीने सोबत आणलेल्या घरातील चाकूवजा सुरीने पत्नीच्या गळ्याजवळ, छातीवर, पायावर सपासप दहा वार केले व नंतर ओढणीने गळा आवळला. काही क्षणात सुचिता यांचा मृत्यू झाला व यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिस अधिकार्यांची घटनास्थळी धाव
महिलेचा निर्घृण खून झाल्याची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे, बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी, बाजारपेठचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, भुसावळ ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी व सहकार्यांनी बुधवारी दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. आरोपी पतीविरोधात शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर हद्दीत वर्षभरात तीन खून
शहर पोलिस ठाणे हद्दीतील लिंम्पस क्लब भागात 13 एप्रिल रोजी संदीप एकनाथ गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या युवकाचा खून करण्यात आला होता. खून प्रकरणी अजय अशोक पाठक (19, ऑर्डनन्स फॅक्टरी परीसर, भुसावळ), पंकज संजय तायडे (19, राहुल नगर, भुसावळ) व आशिष श्रीराम जाधव (19, श्रीराम नगर, भुसावळ) या संशयीतांना अटक करण्यात आली तर दुसर्या घटनेत शनिवार, 8 मे रोजी मध्यरात्री पंजाबी मशीद परीसरातील मोकळ्या मैदानावर सुनील अरुण इंगळे (28) या तरुणाचा संशयीत आरोपी शहाबाज शहा (भुसावळ) याने किरकोळ वादातून खून केला तर सरत्या वर्षात बुधवार, 29 डिसेंबर रोजी सुचिता बारसे या विवाहितेचा पतीने संशयातून खून केल्याची घटना घडली.
मुले झाली आईच्या प्रेमाला पारखी
मयत सुचिता बारसे यांच्या पश्चात दोन वर्षीय व चार वर्षीय अशी दोन मुले आहेत. आईच्या खुनानंतर ही मुले आईच्या प्रेमाला पारखी झाली आहेत. आरोपी शुभम बारसे हा पालिकेत कंत्राटी पद्धत्तीने कामावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मयत विवाहितेच्या पश्चात दोन मुले, आई, वडील, दोन बहिणी असा परीवार आहे. मयत विवाहितेचे आई-वडील शहरातच वास्तव्यास असून हा परीवार मुळचा मध्यप्रदेशातील विदीशा भागातील असून गेल्या 60 ते 70 वर्षांपासून भुसावळात स्थायीक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.