भुसावळातील गोपाळनगर पोलीस चौकीचा दरवाजाही तोडला

0

शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी लोकसहभागातून केली होती दुरूस्ती

भुसावळ- शांतीनगर भागातील भुरट्या चोरट्यावर तसेच उपद्रवींवर पोलिसांचा वचक निर्माण व्हावा यासाठी या भागात शहर पोलीस ठाण्यातंर्गत गोपाळनगर पोलीस चौकी सुरू करण्यात आल होती मात्र पचौकीत पोलिसच रहात नसल्याने पोलीस चौकीला कचराकुंडीचे स्वरूप आले होते. पोलीस प्रशासनाने या बाबीकडेदुर्लक्ष केल्याने उपद्रवींनी आता तर पोलीस चौकीचा दरवाजाच तोडल्याने या भागातील नागरीकांमधून संताप व्यक्त होत असून पोलीस प्रशासन आतातरी जागे होणार का? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

उद्घाटनानंतर बंद पडली चौकी
शहराच्या उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या शांतीनगर भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहर पोलीस ठाण्यातंर्गत गोपाळनगर पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती तर चौकी उद्घाटनाच्या दुसर्‍याच दिवशी बंद पडली ती अवस्था आजही कायम आहे. चौकी बंद असल्याने तिची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या चौकीत एकही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यास तयार होत नाही. शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी बाळासाहेब केदारे यांनी दोन वर्षापूर्वी या पोलीस चौकीला लोकसहभागातून नवे रूप दिले तसेच तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी ,नगराध्यक्ष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पोलीस चौकीचे लोकार्पण झाले. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी चौकी बंद राहणार नाही, असे आश्‍वासन भाषणातून दिले असलेतरी उद्घाटनानंतरच्या दुसर्‍या दिवशी चौकी बंद पडली व या दोन वर्षांच्या काळात शहर पोलिसांचे या चौकीकडे दुर्लक्ष झाल्याने पोलीस चौकीला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले असून उपद्रवींनी चौकीच्या दरवाज्याचीही तोडफोड करण्यापर्यंत मजल वाढली आहे.

लाखो रूपयाचा खर्च गेला वाया
जीर्णावस्थेत आलेल्या गोपाळनगर पोलीस चौकीचे लोकसहभागातून नवनिर्माण करण्यात आले होते. चौकीला रंगरगोटी व दुरूस्ती करून नवे रूप देण्यात आले होते. यासाठी लाखो रूपयाचा खर्च लोकसहभागातून करण्यात आला होता मात्र शहर पोलिसांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे दोन वर्षाच्या कालावधीतच पोलीस चौकी पुन्हा भग्नावस्थेत आली असून यासाठी लाखो रूपयाचा केलेला खर्च वाया गेला आहे.

पोलीस चौकी बनली दारूड्यांचा अड्डा
पोलीस चौकीला गवत व झाडे-झुडुपांचा वेढा पडला असून चौकी लगतच दारूड्यांनी रीचवलेल्या दारूच्या बाटल्या फेकलेल्या दिसून येतात. यामुळे ही पोलीस चौकी दारूड्यांचा अड्डा तर बनली नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलीस चौकीच्या व्हरांड्यात काही दिवसांवूर्वी एका वेडसर महिीलेने आपले बस्तान बसवले होते मात्र तिला हुसकावून लावण्यात आले मात्र उपद्रवींनी आपला डाव साधत आता चौकीचा दरवाजाही तोडला आहे.