भुसावळ- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद विकोपाला गेल्यानंतर समता नगरातील रहिवासी तथा पालिकेचे बांधकाम समिती सभापती व भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या घराबाहेर सोमवारी पहाटे दोन वाजता गोळीबार झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून खोलवर तपासानंतर अक्षय प्रताप माहुरकर (21, चक्रधर नगर, भुसावळ) या संशयीत आरोपीस अटक करण्यात आली असून त्याने घटनास्थळी गोळीबार केल्याची कबुली देत गावठी कट्टा काढून दिला असल्याची माहिती बाजारपेठचे निरीक्षक देविदास पवार यांनी दिली.
अध्यक्षपदाचा वाद ; पाच अटकेत
जयंती अध्यक्षपदाच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर सोमवारी पहाटे दोन वाजता नगरसेवक खरात यांच्या समता नगराबाहेरील घराबाहेर गोळीबार झाला होता तर सुरूवातीला तीन गोळ्या झाडल्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात एकच गोळी संशयीत आरोपी अक्षय माहुरकरने झाडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपीला बुधवारी अटक केल्यानंतर गुरूवारी त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला कट्टा तसेच घटनास्थळावरून जप्त केलेली रीकामी पुंगळी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. दरम्यान, आरोपी नेमक्या कोणत्या गटाचा व त्याने गोळी कुणाच्या सांगण्यावरून झाडली? याबाबत माहिती कळू शकली नाही. गोळीबार प्रकरणी. नगरसेवक रवींद्र खरात, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल उर्फ बाळा डिगंबर सोनवणे, नरेंद्र उर्फ बाळा अरुण मोरे, गिरीश देविदास तायडे, शुभम रमेश कांबळे या पाच संशयीत अटकेत असून त्यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य पसार आरोपींचा शहर पोलिसांकडून कसून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. तपास पोलिस उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी करीत आहेत.