भुसावळ- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद विकोपाला गेल्यानंतर समता नगरातील रहिवासी तथा पालिकेचे बांधकाम समिती सभापती व भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या घराबाहेर सोमवारी पहाटे दोन वाजता गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याप्रकरणी अक्षय प्रताप माहुरकर (21, चक्रधर नगर, भुसावळ) यास बुधवारी दुपारी राहत्या घरून अटक करण्यात आली होती. आरोपीस गुरूवारी न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गावठी कट्टा तपासणीला पाठवणार
जयंती अध्यक्षपदाच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर सोमवारी पहाटे दोन वाजता नगरसेवक खरात यांच्या समता नगराबाहेरील घराबाहेर गोळीबार होवून तुफान दगडफेक झाल्याने एक जण जखमी झाला होता तर नगरसेवक रवींद्र खरात, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल उर्फ बाळा डिगंबर सोनवणे, नरेंद्र उर्फ बाळा अरुण मोरे, गिरीश देविदास तायडे, शुभम रमेश कांबळे यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शहर पोलिसांनी घटनास्थळावरून रीकामी पुंगळी जप्त केली होती तर आरोपी अक्षय माहुरकर याच्या ताब्यातून जप्त केलेला गावठी कट्टा शुक्रवारी मुंबईच्या कलीना लॅबमध्ये तपासणीला पाठवण्यात येणार असल्याचे शहरचे पोलिस उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी म्हणाले. या गुन्ह्यातील अन्य आरोपी पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.