भुसावळातील ग्रीनबेल्ट निधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप

0

भुसावळ । शहरात अमृत योजनेंतर्गत ग्रीन बेल्ट विकसीत करण्यासाठी पालिकेस एक कोटी रुपयांचा निधी मिळाला मात्र केवळ कागदोपत्री वृक्षारोपण दाखवून गैरव्यवहार झाल्याने चौकशीची मागणी जनाधार विकास पार्टीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले.

ठराविक भागात वृक्षारोपण, उर्वरित झाडे कोमेजली
सन 2016-17 या वर्षात पालिकेस ग्रीन बेल्ट विकसीत करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या अंतर्गत 2017-18 दरम्यान वृक्ष लागवडीचे काम सुरू झाले असून या योजनेचा मुख्य हेतू साध्य होत नसल्याची टीका जनाधार पार्टीने केली आहे. शहरातील ओपन स्पेस, डिव्हायडर, रस्त्याच्या दुतर्फा भागात वृक्ष लागवडीचा ठराव झालेला असून काम मात्र त्या पध्दतीने न करता झाडांची खरेदी करून काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले तर उर्वरीत झाडे पडून आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री वृक्षारोपण दाखवण्यात आले आहे. या गैरकारभारामुळे मोठ्या प्रमाणात निधी लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. गटनेता उल्हास पगारे, नगरसेवक दुर्गेश ठाकुर, राहुल बोरसे, प्रदीप देशमुख, सिकंदर खान, साजिद शेख, आनंद चोथमल, किरण तायडे, अमर सपकाळे, सचिन पाटील उपस्थित होते. दरम्यान, आरोप तथ्यहिन असल्याचे व नियमानुसार काम सुरू असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले.