भुसावळ : चारचाकीतून आलेल्या चोरट्यांनी अपार्टमधील बंद प्लॅटमध्ये चोरी केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चौघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण चार लाख 95 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रघुनाथ चुडामण चौधरी (शिव कॉलनी, समर्थ अपार्टमेंट, भुसावळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून तपासाला वेग
शिवपूर कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंटमधील रहिवासी असलेल्या रघुनाथ चौधरी यांच्या घरी शनिवारी दुपारी एक वाजेच्या चारचाकीतून आलेल्या हायप्रोफाईल चोरट्यांनी अवघ्या 20 मिनिटात भरदिवसा अपार्टमेंटमधील बंद प्लॅट फोडून चार लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. त्यात कपाटातील तीन तील लाख 15 हजार रुपयांची रोकड आणि एक लाख 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे चोरीला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी तीन पथके तयार केली असून टोलनाक्यावरील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी तसेच अपार्टमेंट परीसरात कुठे-कुठे सीसीटीव्ही आहेत तसेच मोबाईचा डम डाटा संकलीत केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी काही संशयीतांची यादी तयार केली असून त्यांचीदेखील चौकशी केली जात आहे.