भुसावळातील चैन चोरटा जावेद अली स्थानबद्ध

आंतरराज्यीय चैन चोरट्यावर कारवाईने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात उडाली खळबळ : औरंगाबाद गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ : महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात धूम स्टाईल चोर्‍या करणार्‍या भुसावळातील अट्टल गुन्हेगार जावेद उर्फ लंगअली गरूअली इराणी (30, पापा नगर, इराणी मोहल्ला, भुसावळ) यास एक वर्षांसाठी एमपीडीएखाली स्थानबद्ध करण्यात आल्याने भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद गुन्हे शाखेने पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करीत आरोपीला औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे.

अट्टल चोरट्याविरोधात सहा ठिकाणी गुन्हे दाखल
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, अट्टल आरोपी जावेद उर्फ लंगअली गरूअली इराणी (30,भुसावळ) विरोधात उस्मानपूरा, सातारा, शिरपूर, जि.धुळे, जवाहरनगर येथे प्रत्येकी एक तर मोंढा (परभणी) येथे चैन स्नॅचिंगप्रकरणी एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याचा उच्छाद थांबत नसल्याने पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी 20 सप्टेंबर रोजी स्थानबद्धतेचे आदेश जारी केले होते. या अनुषंगाने आरोपीला गुरुवार, 23 रोजी अटक करून औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, पोलीस उपायुक्त दीपक गिर्‍हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, जवाहरनगर निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक अजित दगडखैर, सहा.उपनिरीक्षक द्वारकादास भांगे, नाना हिवाळे, आशा केंद्रे, दीपाली सोनवणे, महादेव दाणे आदींच्या पथकाने केली.

भुसावळातील गुन्हेगारी थोपवणार : पोलीस उपअधीक्षक
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यापूर्वीच संघटीत टोळ्यांसह सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्‍या अनेकांची हद्दपारी करण्यात आली असून आगामी काही दिवसात अवैधरीत्या शस्त्र बाळगणार्‍यांसह शरीराविरोधात गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांसह अवैधरीत्या सावकारीचे दुकान मांडून बसलेल्यांवर धडक कारवाई करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.