माजी आमदार संतोष चौधरी यांची माहिती ; पालिकेच्या कारभाराविरुद्ध बंड ; रावेरची जागा काँग्रेसने मागितली नसल्याचा दावा
भुसावळ- राजकीय दबावतंत्रांचा वापर करून जनआधार विकास पार्टीच्या गटनेत्यांसह चौघा नगरसेवकांना अपात्र करण्यात आले होते मात्र खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर राज्य शासनाला न्यायालयाने फटकारल्याने याचिका मागे घेण्यात आली असून चौघाही नगरसेवकांचे कायम राहिले असल्याची माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परीषदेत दिली. चौधरी यांच्या सियाराम कॉम्प्लेक्समधील कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांशी चौधरी यांनी संवाद साधला. पालिकेच्या कारभारावर चौधरी यांनी टिकेचा आसुड ओढत रावेरची जागा राष्ट्रवादीचीच असल्याचे सांगत अद्याप काँग्रेसच्या वरीष्ठ स्तरावरील श्रेष्ठींनी ही जागाच मागितली नसल्याचा दावाही केला.
जनआधारच्या चौघा नगरसेवकांना दिलासा
भुसावळ पालिकेच्या 27 मार्च 2017 रोजी झालेल्या पहिल्याच सभेत गोंधळ घालून मुख्याधिकार्यांना बाहेर काढण्याची मागणी करीत त्यांना धक्काबुक्की करणार्या जनआधारच्या नगरसेवकांवर कारवाईबाबत तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी प्रस्ताव सादर केला होता शिवाय शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी 20 ऑक्टोबर रोजी जनआधारचे गटनेता उल्हास भीमराव पगारे, रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे, संतोष चौधरी यांना नगरसेवक पदावरून अपात्र करत पाच वर्ष नगरपालिका निवडणूक वा कोणत्याही इतर स्थानिक प्राधिकरणाचा सदस्य होण्यास बंदीही घातली होती. या निर्णयाविरोधात नगरसेवकांनी खंडपीठात रीट पीटीशन दाखल करून दाद मागितली होती तर सुनावणीवेळी राज्य शासनाने नगरविकास विभागाचा नगरसेवकांच्या बाबतीत दिलेला निर्णय मागे घेतल्याने चारही नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्याधिकार्यांना प्रस्ताव पाठवण्याचा अधिकारच नाही
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, मुळात तत्कालीन मुख्याधिकार्यांनी नगरसेवक अपात्रतेबाबत जो (महाराष्ट्र नगरपरीषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमन 1965 च्या कलम 42 (1) 42 (4) मधील तरतुदीनुसार) प्रस्ताव सादर केला, तो सादर करण्याचा त्यांना अधिकारच नाही. सत्ताधार्यांनी राजकीय दबावतंत्राचा वापर करून नगरसेवकांना अपात्र केले मात्र खंडपीठात न्याय मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पालिकेच्या कारभाराविरुद्ध आंदोलन छेडणार
सत्ताधार्यांनी मनमानी चालवली असून आमच्या चारही नगरसेवकांना गुरुवारच्या सभेचे निमंत्रण नाही, एलईडी दिव्यात मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून अमृत योजनेचा बंधारा हतनूरवर होणार असताना आता तो तापी पुलाखाली करण्याचा घाट असून तसे झाल्यास आम्ही आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार चौधरी यांनी दिला. रेल्वेच्या अतिक्रमितांना घर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगून त्यांनी भुसावळात मुख्यमंत्र्यांनी कुणालाही तिकीट निश्चित केले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्र्यांचा आधी फोटो चालत नव्हता मात्र आताच कसे काय बॅनरवर फोटोही आले व लागलीच बॅनरही निघाले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परीषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, गटनेता उल्हास पगारे, रवी सपकाळे, संतोष (दाढी) चौधरी, प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी चौधरी यांच्या हस्ते कृउबातील संचालकांना निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
आदेशाबाबत अद्याप माहिती नाही -नगराध्यक्ष
जनआधारच्या नगरसेवकांबाबत काय आदेश आला आहे हे आपल्याला माहिती नाही, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. चौधरी हे कुणावरही आरोप करू शकतात मात्र आम्हाला राजकारणापेक्षा शहराचा विकास जास्त महत्वाचा आहे व तो सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.