भुसावळातील झोपडपट्टी धारकांना सातबारा मिळण्यासाठी जेलभरो आंदोलन

0

आजी-माजी आमदारांचे मतांसाठी राजकारण -माजी नगरसेवक जगन सोनवणेंचा आरोप

भुसावळ- रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी व टपरी धारकांचे पुर्नवसन करावे, उद्ध्वस्त कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई द्यावी तसेच सातबारा उतारा प्राधान्याने द्यावा आदी मागण्यांसाठी पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे प्रदेश महासचिव जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ गुरुवारी सकाळी 11.30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलक रस्त्यावरच झोपल्याने चारही बाजूची वाहतूक ठप्प झाली तर पोलिसांनी लागलीच धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. आंदोलनानंतर जगन सोनवणे यांनी शासकीय विश्रामगृहावर दुपारी दोन वाजता पत्रकार परीषद घेवून आमदार संजय सावकारे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यपद्धत्तीवर टिका करीत उभय पदाधिकारी मतांसाठी राजकारण करीत असल्याचा आरोप केला.

आंदोलकांना अटक व सुटका
गुरूवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास आंदोलक यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ पोहोचले. झोपडपट्टी धारकांना न्याय मिळण्यासाठी घोषणाबाजी करीत आंदोलकांनी यावल रस्ता अडवला व रस्त्यावरच झोपून घोषणाबाजी केली. झोपडपट्टी धारकांना सातबारा उतारा द्यावा, उद्ध्वस्त कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले व नंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली. प्रसंगी सोनवणे यांनी आजी-माजी आमदारांच्या कार्यपद्धत्तीवर टिका केली तसेच रेल्वे प्रशासनाच्या कारवाईच्या निषेध नोंदवला. झोपडपट्टी धारकांना न्याय मिळण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढा सुरू राहणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.