भुसावळ- पूर्व वैमनस्यातून शहरातील टँकर चालकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यामागील विहिरीवर शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली होती. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाल्यानंतर रविवारी त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. सोमवारी आरोपींना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्या, या गुन्ह्यात अन्य पाच संशयीत पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
दोघे आरोपी पोलिस कोठडीत
सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्या टँकवर चालक असलेल्या विकास देविदास सपकाळे (40, भोई नगर, भुसावळ) यांच्यावर शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सात संशयीतांनी तलवार हल्ला केल्याने सपकाळे गंभीर जखमी झलो होते. या प्रकरणी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (23, शिव कॉलनी, भुसावळ) व अमोल चौधरी यांना अटक करण्यात आली असून सोमवारी न्यायालयाने दोघांना 29 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या गुन्ह्यात अन्य पाच संशयीत असून ते पसार झाले आहेत. शहर पोलिस ठाण्याच्या दोन पथकांतर्फे त्यांचा कसून शोध सुरू आहे. जखमी विकास सपकाळे यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.