भुसावळ : ट्रामा सेंटरमुळे उपचाराच्या चांगल्या सुविधा मिळणार अयसून महामार्गावर होणार्या अपघातातील जखमींवर तातडीने मदत होईल शिवाय भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड आदी तालुक्यातील रुग्णांना जळगाव किंवा डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व हॉस्पीटलला जाण्याची गरज भासणार नाही, असा आशावाद पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे व्यक्त केला. बुधवारी ट्रामा सेंटरच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
आरोग्याची अधिक खबरदारी घेणे गरजेचे
भुसावळ शहर कोरोना हॉटस्पॉट ठरले असून भुसावळ येथील नागरीकांनी आरोग्याची अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले की, ट्रॉमा केअर सेंटरसाठी दोन एमबीबीएस डॉक्टर, परीचारिका, एक वॉर्ड बॉय आणि फार्मासिस्ट यासह 12 कर्मचारी नियुक्त असून आवश्यकतेनुसार बेड देखील वाढविण्यात येतील. एकदा आवश्यक वैद्यकीय पुरवठा झाल्यावर शस्त्रक्रिया देखील केली जाईल .जिल्ह्यातील कोरोनातील वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे परंतु नागरीरकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज आहे. हा लढा केवळ प्रशासनाचा नाही, तर सर्वांनी संघटीत पद्धतीने कोरोनाशी लढा द्यायचा आहे. जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असली तरी,चांगले होऊन घरी परत जाणार्या रुग्णांची संख्याही वाढत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ट्रामा केअर सेंटर शेजारील नवोदय विद्यालयात कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
देखील पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
सुविधा जनता कदापि विसरत नाही
लोकप्रतिनिधींनी जनतेला दिलेल्या सुविधांमधील पाणीपुरवठा, शिक्षणासाठी शाळांचे बांधकाम व आरोग्याच्या सुविधा जनता कधीही विसरत नाही. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्री असतानाच्या काळात ट्रामा सेंटर व ग्रामिण रुग्णालय मंजूर केले होते. ही सुविधा भुसावळकरांची आता महत्वाची ठरणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, ट्रॉमा सेंटरचे प्रमुख तथा वैद्यकीय अधिकारी देवर्षी घोषाल, जिल्हा कोविड नोडल अधिकारी यांच्यासह नगरसेवक पिंटू कोठारी, नगरसेवक मनोज बियाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.यु.कुरेशी, कंत्राटदार योगेश पाटील, विनय बढे यांच्यासह प्रशासकीय व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कोरोनामुळे बुधवारी अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील महामार्गावरील ट्रामा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.