यावलमध्ये 75 लाखांच्या विकासकामांना जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी

0

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची माहिती : निविदा प्रक्रियेनंतर होणार कामे

यावल : यावल नगरपरीषदेच्या विविध विकास कामांना नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा गटनेता अतुल पाटील यांनी दिली.

शहरात अशी होणार विकासकामे
नगरपरीषदेच्या विकासकामांचा प्रस्ताव नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेतून मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जळगाव यांच्याकडून तांत्रिक मंजुरी घेऊन प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आल्यानंतर त्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक तीनमधील गंगेश्वर महादेव मंदिरा मागील भागात गटार बांधकाम, प्रभाग क्रमांक नऊमधील भागवत कोलते यांच्या घरापासून मधुकर चौधरी यांच्या घरापर्यंत गटार बांधकाम, प्रभाग क्रमांक सहामधील विविध भागात गटार बांधकाम, प्रभाग क्रमांक तीनमधील विविध भागात गटार बांधकाम, प्रभाग क्रमांक आठमधील महाजन टी डेपोपासून ते विश्व ज्योती चौक भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, गट नंबर 724 वरील खुल्या जागेस कंपाउंड वॉल बांधणे अशा एकूण 74 लाख 56 हजार 153 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. हे काम मंजुरीसाठी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी बबन तडवी, कनिष्ठ अभियंता शेख व योगेश मदने यांनी सहकार्य केले.