‘मन की बात’मध्ये केला उल्लेख : नरेंद्र मोदी म्हणाले, कठीण प्रसंगात संगीत देईल तुम्हाला आनंद
भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळातील डॉ.केळकर दाम्पत्याच्या माऊथ ऑर्गन छंदाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात डॉक्टर दाम्पत्याची माऊथ ऑर्गनची क्लीप दाखवल्यानंतर तुम्हीदेखील असे करू शकतात, संगीतामुळे तुम्हाला आनंद मिळेल व जुन्या आठवणी ताज्या होतील, असे सांगत कठीण प्रसंगातही तुम्हाला तुमच्यासह कुटुंबाशी जोडण्याची संधीही मिळाल्याचा उल्लेख त्यांनी देशवासीयांना संबोधीत करताना केला. दरम्यान, भुसावळातील डॉक्टर दाम्पत्याच्या छंदाची थेट पंतप्रधानांनी दखल घेतल्याने भुसावळकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
‘बायपास’नंतर डॉक्टरांनी दिला माऊथ ऑर्गन वाजवण्याचा सल्ला
भुसावळ शहरातील सर्जन डॉ. आशुतोष केळकर व स्त्री रोग तज्ञ डॉ.सुजाता केळकर यांची माऊथ ऑर्गन वाजवतानाची क्लिप काही महिन्यांपूर्वीच सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. वैद्यकीय व्यवसाय सांभाळून या दाम्पत्याने माऊथ ऑर्गनच्या सादरीकरणाने देश-विदेशात नाव कमावले आहे. विशेष म्हणजेे बायपास शस्त्रक्रिया झाल्यावर डॉ.आशुतोष केळकर हे फुप्फुसाच्या व्यायामासाठी माऊथ ऑर्गनकडे वळले होते मात्र व्यायामाच्या या सवयीचे त्यांनी नंतर छंदात रुपांतर केले. डॉ.आशुतोष केळकर यांच्यावर जून 2014 मध्ये पुण्यात बायपास शस्त्रक्रिया झाली होती. सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना माऊथ ऑर्गन वाजवण्याचा सल्ला दिला मात्र या वाद्याचा त्यांना कोणताही गंध नसल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करण्यासाठी सुरूवातीला दोन हजारांचा माऊथ ऑर्गन विकत घेतला. प्रारंभी वाद्याची जाण नसल्याने त्यातून निघतील तसे सूर ते काढत होते मात्र काही दिवसातच त्यांना वाद्याचा लळा लागला. डॉ.केळकर इंडीयन माऊथ ऑर्गन प्लेअर ग्रुपला जॉइंट झाले. ग्रुपमधील सदस्यांशी परीचय झाल्यावर त्यांना शास्त्रशुद्ध माहिती मिळाली. या ग्रुपमधील सदस्यांनी त्यांना इंदूर येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा आग्रह केला. या स्पर्धेतील सादरीकरणाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर ओळख प्राप्त करून दिली. डॉ.आशुतोष यांच्यापासून प्रेरणा घेत पत्नी डॉ.सुजाता केळकर यादेखील माऊथ ऑर्गनकडे वळल्या.
इंदूरच्या स्पर्धेपासून सुरूवात
भुसावळातील डॉक्टर केळकर दाम्पत्याने इंदूर येथील स्पर्धेत सुप्रसिद्ध गायक जगजीत सिंह यांची गझल ‘होशवालो को खबर क्या’ सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. नंतर मुंबईत ‘याद किया दिलने कहा हो तुम’ आणि राग भैरव सादर केला. जयपूरला आयोजित स्पर्धेत कुर्बानी सिनेमातील ‘लैला ओ लैला’, कोलकत्ता येथे ‘दिलबरा दिलबरा’, हरिद्वारच्या स्पर्धेत ‘बार बार देखो हजार बार देखो’, हैदराबादला ‘गाता रहे मेरा दिल’ आणि जर्मनी येथे झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे नेतृत्व करताना डॉ.केळकर यांनी ‘हम तुम एक कमरेमे बंद हो’हे लोकप्रिय गीत सादर केले होते. डॉ. केळकर दांपत्याने आतापर्यंत 25 जणांना माऊथ ऑर्गनचे वाटप केले. युवकांनी माऊथ ऑर्गन शिकावे हा त्यामागील हेतू आहे. सोशल मीडियावर त्यांच्या सादरीकरणाचा व्हीडीओ व्हायरल होत असल्याने त्यांना देश-विदेशातून अनेकांचे फोन येत आहेत. या छंदामुळे बायपासनंतर प्रकृती सुधारल्याचे डॉ.आशुतोष केळकर यांनी सांगितले. डॉ.केळकर दाम्पत्याने 2017 मध्ये जर्मनीत झालेल्या स्पर्धेत भाग नोंदवला होता तर 2015 पासून सलग राष्ट्रीय स्पर्धेत ते सहभाग नोंदवत आहेत.
पंतप्रधानांकडून छंदाची दखल : दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी देशवासीयांना संबोधीत करतानाच लॉकडाऊनमुळे घरात थांबून असलेल्या नागरीकांना छंद जोपासण्याचे आवाहन केले. त्याचवेळी डॉ.केळकर दाम्पत्याची काही सेकंदाची क्लीपही दाखवण्यात आली. यानंतर दिवसभर भुसावळसह राज्यभरातून डॉ.केळकर दाम्पत्यास अभिनंदनाचे अनेक दूरध्वनी आले तर त्यांच्या या आगळ्या वेगळ्या छंदाने अनेकांनी तोंडभरून कौतुकही केले.