फैजपूर हद्दीतील तापी नदीच्या पुलावार दुचाकी लावून घेतली उडी ; तरुणाच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
भुसावळ- शहरातील खळवाडी, शिव कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय तरुणाने तापी नदीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. भूपेंद्र मुकुंदा बोंडें असे मृत तरुणाचे नाव आहे. भूपेंद्र याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती कळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. तापी पुलाकडील बाजू फैजपूर हद्दीत येत असल्याने फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
तापी पुलावर उडी घेत संपवले जीवन
मयत भूपेंद्र बोंडे खळवाडी भागातील शिव कॉलनीत भाऊ, वहिनी व आईसह वास्तव्यास होता. नुकतेच लाईफ केअर रुग्णालयामागे घर बांधल्यानंतर तीन दिवसांपूर्वी बोंडे कुटुंबीय नव्या वास्तूत राहण्यासाठी गेले होते. भूपेंद्रने रेल्वेत अॅप्रेंटीसदेखील केल्याची माहिती मिळाली तर त्याचा मोठा भाऊ भुसावळातील रेल्वेच्या ओएचई भागात फिटर म्हणून नोकरीस आहे. मध्यमवर्गीय सुखी कुटुंबातील भूपेंद्रने अचानक आत्महत्या का केली? याचे ठोस कारण कळू शकले नाही. सकाळीच नाईट ड्रेसवर भूपेंद्र तापी पुलावर आला व त्याने झोकून उडी घेत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात किरण मुरलिधर वानखेडे यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल येथे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी भुसावळ येथे मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास पोलिस कॉन्स्टेबल उमेश चौधरी करीत आहेत.