भुसावळातील तरुणावर चाकू हल्ला करणारे आरोपी जाळ्यात

0
भुसावळ- जुन्या वादातून शहरातील तरुणावर तिघांनी चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे आरोपी पोलिसांना शरण आल्याने त्यांना अटक करण्यात आली. जुन्या भांडणाच्या कारणातून वांजोळा रोडवरील गायत्री शक्तीपीठामागे गिरीष गजेंद्र जगताप (वय 22) या तरुणावर तिघांनी चाकू हल्ला केल्याने गिरीष जखमी झाला होता. या प्रकरणी अमोल काशिनाथ राणे, मयूर बडगे व अक्षय प्रकाश न्हावकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपींनी पिस्टल सारख्या हत्याराचा धाक दाखवत गिरीषच्या छातीवर, खांद्यावर चाकू मारून वार करून गंभीर जखमी करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अक्षयने गिरीषला धरून ठेवत मारहाण करीत शिवीगाळ केली होती. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, उपनिरीक्षक निशिकांत जोशी व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी  नयन आनंदा पवार (रा. कोळीवाडा, भुसावळ) याच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन संशयीत बाजारपेठ पोलिसांना शरण आल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.