भुसावळातील तापी नदीकिनारी असलेल्या सबस्टेशनचा मार्ग झाला धोकेदायक

0

दरड व विजेचा खांब कोसळ्ण्याची भीती ; कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेवून करावे लागते मार्गक्रमण

भुसावळ- शहराला वीजपुरवठा करणार्‍या तापीनदी किनार्‍यावरील सबस्टेशनचा मार्ग धोकेदायक झाला आहे. या मार्गावर असलेली दरड कुठल्याही क्षणी कोसळ्ण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच मार्गावरील विजेचा खांबही वाकलेला असून तो केव्हाही पडण्याची भीती असल्याने कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेवूनच या मार्गावरून मार्गक्रमण करावे लागत आहे.

दरड कोसळून अपघाताची भीती
भुसावळ शहराला तापी नदीकिनारी असलेल्या राहुल नगरजवळील सबस्टेशनवरून वीजपुरवठा केला जातो मात्र या सबस्टेशनकडे जाणार्‍या मार्गावर असलेल्या उंच टेकडीची दरड धोकेदायक झाली आहे. ही दरड कुठल्याही क्षणी कोसळ्ण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच या मार्गावर असलेले विजेचे पोल ही दरडची माती पावसामूळे वाहून जात असल्याने कोसळ्ण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे सबस्टेशनवर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना जी मुठीत घेवून रात्री अपरात्री या मार्गावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेवून या धोकेदायक मार्गाची तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा विपरीत घटना घडल्यास शहरातील काही भागाचा वीजपुरवठा खंडीत होवून शहरवासीयांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वीज वाहक तारांना वेलीचा वेढा
शहरातील बहुतांश वीज रोहित्र व वीज खांबांना पावसाळी वेलींचा गराडा पडला आहे. यामुळे एखाद्यावेळी वेलीद्वारे वीजपुरवठा जमिनीत उतरून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज वितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वी वीज वाहक तारांना अडसर ठरणार्‍या हिरव्यागार झाडांच्या फांद्याची तोडणी केली जाते मात्र वीज वाहक तारांना पडलेल्या वेलींचा गराडा काढण्याकडे दुर्लक्ष का होत आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

सबस्टेशनमध्ये 20 कर्मचारी कार्यरत
शहराच्या उत्तरेकडील भागातील शांतीनगर, महिला महाविद्यालय, गणेश कॉलनी अशा विविध भागात सबस्टेशनवरून वीजपुरवठा केला जातो. यासाठी सबस्टेशनवर 20 कर्मचारी कार्यरत असून यामध्ये चार महिला अप्रेंट्रीस करीत आहेत मात्र राहुल नगराजवळील या सबस्टेशनमध्येही अनेक सुविधा निर्माण होत आहेत. याकडे प्रशासनने वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

भिंतीलाही पाण्याची गळती
सबस्टेशनच्या मार्गावर असलेले साईचंद्रनगर हे उंच टेकडीवर असून या रहिवासी भागाला संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे मात्र या भागातील सांडपाण्याचा निचरा संरक्षण भिंतीमधुन होत असल्याने संरक्षण भिंतही पडक्या अवस्थेत आली आहे. यामुळे या रहिवासी भागालाही धोका निर्माण होवू शकतो. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.