बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई ; शिक्षण क्षेत्रात खळबळ
भुसावळ- शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल या विना अनुदानीत संस्थेत खाजगी तत्वावर शिपाई म्हणून कामास असलेल्या तरुणाकडून दहा हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील घासीलाल वड्याजवळ ही कारवाई करण्यात आली. सचिन पांडुरंग पारधी (24, रा.मोंढाळा, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे एएसआय अंबादास पाथरवट यांना जामनेर रोडवरील घासीलाल वड्याजवळ एका संशयीताच्या कमरेला गावठी कट्टा लावला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सायंकाळी सापळा रचला. पाथरवट यांच्यासह नाईक सुनील थोरात, प्रशांत चव्हाण, निलेश बाविस्कर, उमाकांत पाटील, योगेश माळी, संदीप राजपूत यांनी गोपनीय माहितीवरून मिळालेल्या संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेले 10 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. या पिस्टलात काडतुस नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी दीपक अशोक जाधव यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी सचिन पांडुरंग पारधी (24, रा.मोंढाळा, ता.भुसावळ) विरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत. दरम्यान, आरोपीने गावठी पिस्टल का व कुणाकडून आणले याची माहिती पोलिस कोठडीत निष्पन्न होणार आहे.