भुसावळातील तिरूपती पेट्रोल पंपाला विद्युत निरीक्षकांची भेट

0

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील तिरूपती पेट्रोल पंपावरील कारंजात वीज प्रवाह उतरल्याने दोघा चिमुकल्यांचा अंत झाला होता. या घटनेनंतर जळगाव येथील अधिकार्‍यांनी पेट्रोल पंपाला भेट देत पंपावर असलेल्या गार्डनमधील कारंजात दिलेला वीज पुरवठा तपासण्यात आला. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

वरीष्ठांना अहवाल देणार
जामनेर रोडवरील तिरूपती पेट्रोल पंपावर तयार करण्यात आलेल्या गार्डनमध्ये कारंजा सुरू करण्यात आला होता. यावेळी तेथे खेळत असलेले गणेश राखुंडे आणि दिपक राखुंडे हे खेळत असतांना एक भाऊ कारंजाच्या कुंडात पडला त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला असतो तो सु्ध्दा वीजेचा करंट लागून मरण पावला. याप्रकरणी पंप चालक प्रीतम कारडा व सोनू कारडा या दोन्ही जणांविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत असून त्यांनी वीज कंपनीला पंपावरील कारंजामधील वीज प्रवाह आणि वायरिंग तपासून मिळावी म्हणून पत्र दिले होते. त्यानुसार सोमवारी जळगाव येथील विद्युत निरीक्षक जी.एन. सुरडकर, शाखा अभियंता सी.एस. चौधरी, सहायक अभियंता एस.डी. चौधरी यांच्यासह महावितरणचे अभियंता व्ही.बी. पाटील, अभियंता पंकज वाघुळदे, दत्तू चौधरी, सुधीर भारंबे, पितांबर पाटील, जगदीश वाघ यांनी सोमवारी दुपारी 12 वाजेपासून दिडपर्यत पंपावर तळ ठोकून सर्व वायरिंगची तपासणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, कीशोर महाजन यांनीही वीज अधिकार्‍यांसह संयुक्त पंचनामा केला. घटना घडल्यापासून पेट्रोल पंप बंदच ठेवण्यात आला होता. सोमवारी सुध्दा पंप बंद होता. वीज वितरण कंपनीचे आणि जळगाव येथून आलेल्या अधिकार्‍यांनी तपासणी केली असून याप्रकरणाचा अहवाल लवकरच वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर केला जाणार आहे. तसेच त्या अहवालाची एक प्रत पोलिस प्रशासनालाही दिली जाणार आहे.

अहवालाकडे लागले लक्ष
पेट्रोल पंपावरील गार्डनमध्ये दिपक व गणेश या दोन्ही भावांचा वीजेचा करंट लागून मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. धुळे येथील रहिवासी असलेले दोन्ही भावंडे आई सोबत आजोंबांकडे दिवाळीपासून आले होते. शनिवारी रात्री खेळत असतांनाच त्यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी करण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल कधी प्राप्त होतो याकडे लक्ष लागले आहे.