भुसावळातील ‘ती’ 99 घरे अखेर जमीनदोस्त

0

पोलिस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त : सलग नऊ तास चाललेल्या मोहिमेत 54 वर्षांचे अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश

भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती आल्याने या मार्गाच्या कामात अडथळा ठरणारी दीनदयालनगरातील 99 घरे गुरूवारी सकाळी आठ ते पाच तास सलग नऊ तास चाललेल्या मोहिमेत जमीनदोस्त करण्यात प्रशासनाला यश आले. मोहिमेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार न घडण्यासाठी पोलिस प्रशासनाने तगड्या बंदोबस्ताचे नियोजन केले होते. दरम्यान, 1966 च्या दशकात या भागात नागरीकांनी या भागात वस्ती केली होती मात्र महामार्ग प्राधिकरणाच्या जागेत ही घरे बांधण्यात आल्याने अतिक्रमण ग्रस्तांना हटवण्यापूर्वी प्रशासनाने त्यांना मोबदलादेखील देवून घरे खाली करण्याबाबत यापूर्वीच नोटीस बजावली होती. बुधवारी अनेकांनी घरे खाली करून बिर्‍हाड इतरत्र हलवले होते तर काहींनी गुरुवारी मोहिम सुरू होण्यापूर्वी मिळेल त्या साधनाद्वारे साहित्य हलवले तर काहींच्या घरावरून जेसीबी फिरल्यानंतर दरवाजे, पत्रे तसेच अन्य साहित्य हलवताना अनेकांच्या डोळ्यात नकळत अश्रूही तरळले.

चौघांच्या मोबदल्याबाबत संघर्ष
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दीनदयाल नगरातील 99 घरे ही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरत असल्याने घर मालकांशी चर्चा करून त्यांना मोबदला देण्यात आला होता मात्र चंद्रकांत चौधरी यांच्यासह चौघांनी मोबदला नाकारला न्यायालयीन लढाई सुरू असल्याने गुरुवारी व्हिडिओ पंचनामा करून घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी या परीसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला तसेच 99 घरांचे वीज कनेक्शन कट करून त्यांचे मीटरही जप्त करण्यात आले.

भल्या पहाटेच बंदोबस्त दाखल
गुरूवारी भल्या पहाटे सहा वाजेपासून या परीसरात पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला. महामार्ग प्राधीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे सातला दाखल झाले. यापूर्वी महामार्ग प्राधीकरण विभागाकडून जी घरे पाडायची आहे त्या घरांचे सर्व्हेक्षण करून तेथे मोजमाप व खुणा करण्यात आल्याने प्रत्यक्षात आठ वाजता मोहिमेला सुरूवात झाली. पाडलेल्या घराच्या मलब्यातून रहिवाशांनी घराच्या खिडक्या, दरवाजे, पत्रे, लाकडे व लोखंड जमा केले तर भंगार व्यावसायीकांनीदेखील लोखंड मिळवण्याचा प्रयत्न केला.

तगड्या बंदोबस्तात निघाले अतिक्रमण
डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोबे, तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला. आठ दुय्यम अधिकारी, तीन आरसीपी प्लॉटूनच्या तुकड्या, 80 पोलिस कर्मचारी, 20 महिला पोलिस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत अतिक्रमित घरे पाडण्यात आली. जिल्हाभरातून बंदोबस्तासाठी पोलिस दाखल झाले होते. सहा जेसीबी मशीन, चार ट्रॅक्टर, एक पोकलॅण्ड, चार डंपर, 100 मजुरांच्या सहाय्याने घरे पाडण्यात आली तसेच मलबा हटवण्यात आला.

तर तीव्र आंदोलन -चंद्रकांत चौधरी
महामार्ग प्राधीकरण विभागाकडून पुर्नवसीत घरेही काही प्रमाणात काढण्यासंदर्भात चर्चा करीत असू तसे झाल्यास स्थानिक रहिवासी आंदोलन करून अधिकार्‍यांची मनमानी मोडीत काढतील व तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा चंद्रकांत चौधरी व त्या परीसरातील रहिवाशांनी दिला आहे. अनेक जणांना मोबदला कमी मिळाला आहे त्यामुळेही तेथील रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्यात. याबाबत न्यायालयात दाद मागितली जाईल, असे जयप्रकाश नारायण बहुउद्देशीय संस्थेचे संचालक चंद्रकांत चौधरी यांनी दिला.

पालिका दवाखान्यातील औषधी उघड्यावर
दीनदयाल नगरात जमीनदोस्त करण्यात आलेल्या घरांसोबत पालिकेचा दवाखानादेखील जमीनदोस्त करण्यात आला. काही वर्षांपूर्वीच हा दवाखाना बंद करण्यात आल्याने केवळ येथून लसीकरणाचे कामे आतापर्यंत होत होती मात्र बालकांसाठी शक्तीवर्धक (आर्यन कॅप्सुल) या दवाखान्यात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. अतिक्रमण हटवताना या दवाखान्यातील मोठ्या प्रमाणावरील औषधी दवाखान्याबाहेर टाकण्यात आल्याने अनेक नागरीकांनी बेमालुमपणे त्या घटनास्थळावरून उचलल्या त्यामुळे या औषधी कालबाह्य झाल्या होत्या की वापरण्यायोग्य होत्या हे कळण्यास मार्ग नाही शिवाय या औषधांच्या सेवनातून काही गैरप्रकार घडल्यास जवाबदार कोण? असादेखील प्रश्‍न उपस्थित होत आहे. आरोग्य विभागाचा भोंगळ कारभारही यातून उघड झाला असून या प्रकाराची चौकशी करण्यासह दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर म्हणाल्या की, दवाखाना काही वर्षांपूर्वीच बंद झाला असून तेथे आर्यन गोळ्या असाव्यात, उद्याच या भागात सर्वे करून ज्यांनी गोळ्या नेल्या असतील त्या परत घेण्याच्या सूचना केल्या जातील, असे त्या म्हणाल्या.