भुसावळ- नाहाटा चौफुलीजवळ दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच पैकी तीन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती तर दोन पैकी एका संशयीताला कोम्बिंगमध्ये पोलिसांनी पकडले होते. संशयीत कलीम शेख सलीम यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी चौकशीत आरोपीच्या ताब्यातून बंदुकीच्या आकाराचा मात्र लायटर असलेला कट्टा जप्त केला आहे तर न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत सोमवारी रवानगी केली. शुक्रवार, 1 रोजी रात्री 12.30 वाजेनंतर बाजारपेठ पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील नाहाटा चौफुली जवळील वैतागवाडीतील काही अट्टल गुन्हेगार ट्रॅव्हल्सवर दरोडा टाकत असल्याची संशयावरून पकडले होते. यावेळी कलीम शेख सलीम, सुरेश राजू पवार उर्फ टकल्या, संदीप बुधा खंडारे, शुभम धनंजय साबळे व गोल्या शेख शरीफ हे पाच संशयीत हातात तलवार, लायटर असलेला कट्टा बाळगून असताना पोलिसांना पाहताच कलीम शेख सलीमने पळ काढला होता मात्र अन्य तिघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या गुन्ह्यात गोल्या शेख शरीफ हा अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू आहे.