भुसावळातील दहा नगरसेवकांच्या अपात्रतेवर आता 18 रोजी अंतिम सुनावणी

भुसावळ  : भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल आहे. या याचिकेवर अनेकदा सुनावणी होवून तारीख पे तारीख पुढे सरकत असलीतरी आता अखेरची सुनावणी 18 जुलै होईल, अशी शक्यता आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या निकालानंतर दहा दिग्गज नगरसेवकांचे भवितव्य आगामी निवडणुकीत काय असेल याचा फैसला होणार आहे त्यामुळे शहरातील सर्वच राजकीय धुरीणांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.

असे आहे नेमके प्रकरण
भुसावळ नगरपालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे (प्रभाग 1 ब), लक्ष्मी रमेश मकासरे (प्रभाग 1 अ), सविता रमेश मकासरे (प्रभाग 2 अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग 6 ब), मेघा देवेंद्र वाणी (10 अ), अ‍ॅड.बोधराज दगडू चौधरी (9 ब), शोभा अरुण नेमाडे (20 अ), किरण भागवत कोलते (22 ब), व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग 19 अ) हे निवडून आले मात्र त्यांनी 29 डिसेंबर रोजी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच 17 डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यात भाजपामध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाल्याने ते राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्या पाठोपाठ समर्थकही राष्ट्रवादीत आले हे या प्रवेशामागील कारण असलेतरी पक्षांतर कायद्यानुसार अपात्रतेच्या कारवाईसाठी भाजपच्या माजी नगरसेविका पुष्पा बतरा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याचिका दाखल करून राजकीय गोटात खळबळ उडवून दिली होती.

नगरसेवकांतर्फे वकील म्हणणे मांडणार
आतापर्यंतच्या सुनावणी जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही बाजूंकडील म्हणणे ऐकून घेतले असून गुरुवार, 14 जुलै रोजी या प्रकरणी निर्णय अपेक्षीत असलातरी 10 नगरसेवकांच्या वतीने बाजू मांडणार्‍या वकिलांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने अंतीम सुनावणी सोमवार, 18 जुलै रोजी होणार आहे. 10 नगरसेवकांचे वकिल अ‍ॅड. हरीष पाटील, अ‍ॅड.महेश भोकरीकर यांनी तर याचिकाकर्त्यांतर्फे वकिल अ‍ॅड. राजेंद्र राय यांनी काम पाहिले.