भुसावळातील दुय्यम कारागृहातील समस्यांबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार

0

नूतन पोलिस उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांची भेटीप्रसंगी माहिती

भुसावळ- शहरातील दुय्यम कारागृहात कैद्यांसाठी स्वच्छ पाणी, स्वतंत्र स्वयंपाकगृह तसेच कर्मचारी निवासस्थानांसाठी प्रशस्त जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याची माहिती नूतन पोलिस उपमहानिरीक्षक दिलीप कृष्णराज झळके यांनी दिली. महिनाभरापूर्वीच झळके यांनी उपमहानिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला असून राज्यातील प्रत्येक जिल्हा कारागृहाला ते भेटी देत आहेत. मंगळवारी जळगाव जिल्हा कारागृहाला भेट दिल्यानंतर त्यांनी बुधवारी भुसावळातील दुय्यम कारागृहाला सकाळी 11 वाजता भेट दिली. प्रसंगी भुसावळ जेल अधीक्षक बिभीषण विश्‍वनाथ तुतारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

विविध विभागांची केली पाहणी
प्रसंगी दिलीप झळके यांनी दुय्यम कारागृहातील विविध विभागांची पाहणी केली तसेच काही कैद्यांशी संवादही साधला. कारागृहात पिण्यासाठी बोरींगचे पाणी असल्याने त्यात क्षारचे प्रमाण जास्त असल्याने शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले शिवाय स्वतंत्र स्वयंपाकघर व कर्मचार्‍यांसाठी कमी खोल्या असल्याने स्वतंत्र निवास व्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी झळके म्हणाले की, राज्यातील प्रत्येक कारागृहात कैदी ठेवण्याची अडचण आहेच त्यामुळे या प्रश्‍नीदेखील लक्ष घालण्यात येणार आहे.

भुसावळातील वर्ग 1 च्या कारागृहाबाबत लक्ष घालणार
जामनेर रोडवरील पोलिस उपअधीक्षक कार्यालयामागे अत्याधूनिक वर्ग- 1 चे कारागृहाला मंजुरी असून शासनाकडून जागाही प्राप्त झाली आहे मात्र अद्याप कारागृहाबाबत काहीही हालचाल नसल्याची माहिती झळके यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी औरंगाबाद गेल्यानंतर या प्रकरणात लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली. जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत मात्र तेथे कारागृहाची क्षमता वाढवता येणे शक्य नाही मात्र भुसावळात 500 बंदीवान राहू शकतील इतकी प्रशस्त जागा वर्ग एकचे कारागृह मंजूर असल्याने त्याबाबत गती मिळणे आवश्यक आहे.