यावल- चारचाकी वाहनातून मिरची पावडर व तलवार घेऊन जाणार्या दोघांच्या मुसक्या यावल पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान आवळल्या. शुक्रवारी रात्री यावल-चोपडा मार्गावरील वनविभागाच्या कार्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली. दीपक श्रावण लोखंडे (23) व सागर संजय शेटे (23, आरपीएफ बॅरेकजवळ, लिंपस क्लब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फैजपूरचे डीवायएसपी राजेंद्र रायसिंग यांनी नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक डी.के.परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जे.मोरे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, संजय तायडे, हवालदार विजय चौधरी, सतीश भोई, ज्ञानेश्वर कोळी, संजय देवरे, राहुल चौधरी यांच्या पथकाने यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर वनविभागच्या कार्यालयाजवळ सापळा रचून चारचाकी (एम.एच. 19 एन. ए. 1629) गाडीला अडवले. यावेळी गाडीतून एक तलवार आणि 50 ग्रम मिरची पावडरसह दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हे दोघे कोणत्या उद्देशाने या भागात शस्त्र घेवून निघाले होते याचा तपास पोलीस हवालदार संजय तायडे करीत आहेत.