भुसावळ (गणेश वाघ) : सामाजिक शांततेला उपद्रव ठरू पाहणार्या दोघांच्या हद्दपारीचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढल्याने भुसावळातील गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भुसावळात नुकताच पदभार घेतलेल्या पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी गुन्हेगारांचा डाटा संकलीत करीत गुन्हेगार हद्दपारीची प्रक्रिया राबवत प्रस्ताव सादर केले होते. त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर प्रांताधिकार्यांनी शाकीर गोलू शेख रशीद (रा.विवेकानंद शाळेमागे, 32 खोली, भुसावळ) व विनोद लक्ष्मण चावरीया (रा.72 खोली, वाल्मिक नगर, भुसावळ) यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याबाबत आदेश काढले आहेत.
गुन्हेगारांच्या गोटात उडाली खळबळ
भुसावळातील गुन्हेगारी राज्यभरात चर्चेत असून यापूर्वी घडलेल्या अप्रिय घटनांचा आलेख पाहता शहरात शांतता नांदण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पुढाकार घेतला आहे. गुन्हेगारांचा डाटाच त्यांनी तयार करीत त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास सुरुवात केली आहे शिवाय शरीराविरुद्ध तसेच मालमत्तांविरुद्ध गुन्हे दाखल असलेल्या संशयीतांना हद्दपार करण्यासाठी प्रांताधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील दोन प्रस्तावांवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दोन उपद्रवींना दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत प्रांताधिकार्यांनी आदेश काढले आहेत.
तीन टोळ्या पोलिसांच्या रडारवर
शहरातील तीन टोळ्या सध्या पोलिसांच्या रडारवर असून जिल्हा पोलिस अधीक्षकांना असलेल्या अधिकारान्वये (कलम 55) त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. तीन प्रकरणांवर पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांच्याकडे सध्या त्याबाबत सुनावणी सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांना अहवाल पाठवला जाणार असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.
एका संशयीताला बजावली नोटीस : पोलिस उपअधीक्षक
संशयीत शाकीर गोलू शेख रशीद यास गुरुवारी पोलिसांनी नोटीस बजावली असून नोटीस मिळाल्यापासूनच्या दोन वर्षांपर्यंत संशयीताना जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास प्रतिबंध राहणार असून दुसरा संशयीत अद्याप पोलिसांना मिळून आला नसल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले. सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्यांवर यापुढेही कारवाईचा धडाका सुरू राहणार असून तीन प्रकरणांवर सध्या सुनावणी सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुन्हेगारांच्या टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार होतील, असा आशावादही वाघचौरे यांनी व्यक्त केला.