भुसावळ : सामाजिक शांततेला धोकादायक ठरू पाहणार्या उपद्रवींना हद्दपार करण्यासंदर्भात स्थानिक पोलिस प्रशासनाने सुमारे 39 उपद्रवींचे प्रस्ताव भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे पाठवले होते. प्रस्तावावर अंतिम कामकाज होवून नव्याने शहरातील दोन उपद्रवींना जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश प्रांताधिकार्यांनी मंगळवार, 8 मार्च रोजी काढले. मंगल देविदास कोळी (साकेगाव, ता.भुसावळ) व शेख नईम सलीम शेख (दिनदयाल नगर, भुसावळ) अशी हद्दपार करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
2021 मध्ये सादर होता प्रस्ताव
हद्दपार झालेला संशयीत मंगल कोळी याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात पाच तर शहर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे. दंगल, हाणामारी व चोरी प्रकरणी हे गुन्हे दाखल असून दुसरा संशयीत शेख नईम शेख सलीम याच्याविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यात विनयभंग, हाणामारी, जबरी लूट आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. बाजारपेठचे तत्कालीन निरीक्षक दिलीप भागवत व तालुक्याचे तत्कालीन निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार यांनी संशयीतांना हद्दपार करण्याबाबत 2021 मध्ये प्रस्ताव सादर केला होता. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे प्रस्तावाची चौकशी झाल्यानंतर अंतिम अहवाल प्रांताधिकार्यांकडे पाठवण्यात आल्यानंतर दोन्ही उपद्रवींना एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश निघाल्यानंतर भुसावळातील गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या संशयीतांची आतापर्यंत हद्दपारी
शहरासह तालुक्यातून यापूर्वी पाच संशयीतांना हद्दपार करण्यात आले आहे तर मंगळवारी पुन्हा दोन संशयीतांना हद्दपार करण्यात आल्याने हद्दपार झालेल्यांची संख्या सात झाली आहे. यापूर्वी गणेश रमेश कवडे (गमाडीया प्रेस, जुनी जीन, भुसावळ), राहुल नामदेव कोळी (जुना सातारा, मरीमाता मंदिराजवळ भुसावळ), विशाल राजू टाक (रा.जामनेर रोड, वाल्मिक नगर, भुसावळ), मोहंमद हासीम मोहंमद सलीम शेख (प्रल्हाद नगर, रींग रोड, भुसावळ), रमेश तुकाराम शिंदे (34, वराडसीम) या पाच संशयीतांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.